छत्रपतींचा अवमान; डॉ. कोल्हेंनी संसदेत उचलला मुद्दा, भाषणावेळी माईक बंद करत महाराष्ट्राचा आवाज दाबण्याचा प्रयत्न

dr-kolhe

भाजपच्या नेत्यांकडून वारंवार छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान करणारी विधानं करण्यात येत आहेत. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या विधानामुळे राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. पुण्यात 13 डिसेंबर रोजी बंद पुकारण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी संसदेत मुद्दा मांडला, त्यावेळी अवघ्या दोन तीन वाक्यात माईक बंद करण्यात आला. यामुळे संतापलेले डॉ. कोल्हे यांनी थेट फेसबुकवरून हा प्रकार सगळ्यांसमोर आणला.

फेसबुकवर आपली भूमिका मांडताना डॉ. अमोल कोल्हे म्हणाले की, आज संसदेत छत्रपती शिवाजी महाराजांविषयी बोलत असताना माईक मध्येच बंद करण्यात आला. ‘छत्रपती शिवाजी महाराजांसह इतर महापुरुषांविषयी बोलताना कायद्याची तरतूद करण्यात यावी, अशी मागणी मी करत होतो. जेणेकरून आपल्या अस्मितेला नख लावण्याचं आणि छत्रपती शिवरायांचा अपमान करण्याचं धारिष्ट कोणीच करणार नाही’, असं डॉ. कोल्हे यांनी सांगितलं.

‘संसदेतला माईक बंद केला तरी छत्रपती शिवाजी महाराजांविषयीची भावना दाबता येणार नाही, तो तमाम शिवभक्तांचा आवाज कानठळ्या बसवल्याशिवाय राहणार नाही’, असा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला.