
सोलापूर महापालिकेची कामे करणाऱया अनेक ठेकेदारांची तीन वर्षांपूर्वी केलेल्या कामांची बिले प्रलंबित आहेत. प्रशासकीय स्तरावर अडवणुकीचे धोरण कायम आहे. या अडचणी आठ दिवसांत दूर न झाल्यास रस्ते, ड्रेनेज लाइनसह इतर कामे बंद करू, असा इशारा महापालिका कॉण्ट्रक्टर्स असोसिएशनने दिला आहे.
असोसिएशनचे अध्यक्ष राजभाऊ दुधाळ आणि सहकाऱयांनी महापालिका आयुक्त शीतल तेली-उगले यांना निवेदन दिले. दुधाळ म्हणाले, महापालिकेत 350हून अधिक ठेकेदार पाणीपुरवठा, ड्रेनेज लाइन, गलिच्छ वस्ती सुधार योजना, नगर अभियंता आणि झोन कार्यालयातील कामे करतात. या ठेकेदारांनी अनेकदा आपल्या अडचणी प्रशासनासमोर मांडल्या. ठेकेदारांना जीएसटी रकमेचा फरक मिळत नाही. तीन वर्षांपूर्वी केलेल्या कामांची बिले मिळविण्यासाठी ठेकेदार, लेखाविभाग, खातेप्रमुख आणि अतिरिक्त आयुक्तांच्या दालनात फेऱया मारतात. अधिकाऱयांकडून बिलांवर निर्णय होत नाही. उलट मानसिक त्रास सहन करावा लागतो.
दरम्यान, अनेक ठेकेदारांनी बँकांची कर्जे काढून कामे पूर्ण केली आहेत. ही देणी कशी द्यायची, काम मंजूर करताना सुरक्षित रक्कम ठेवून घेतली जाते. ही रक्कम परत मिळवितानाही नाकीनव येतात. अशा अनेक विषयांवर निर्णय होत नसल्याने सर्वच मक्तेदार महापालिकेला वैतागले आहेत. आयुक्तांनी आठ दिवसांत निर्णय न घेतल्यास काम बंद करणे अटळ असल्याचे असोसिएशनने म्हटले आहे.