नवीन संसद भवनाच्या उद्घाटनाचा वाद सुप्रीम कोर्टात, जनहित याचिका दाखल; राष्ट्रपतींच्या हस्ते उद्घाटन करण्याची मागणी

नवीन संसद भवनाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी करणार आहेत. त्यामुळे हा वाद सर्वोच्च न्यायालयात गेला आहे. देशाच्या प्रथम नागरिक द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते उद्घाटन करावे, अशी मागणी करणारी जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाली असून उद्या शुक्रवारी त्यावर सुनावणी होणार आहे.

मोदी सरकारने उद्घाटन कार्यक्रमाचे निमंत्रणही राष्ट्रपतींना दिले नाही. राष्ट्रपतींऐवजी पंतप्रधानांच्या हस्ते नव्या संसद भवनाचे उद्घाटन करणे हा लोकशाहीचा अवमान आहे, अशी टीका विरोधी पक्षांनी केली आहे. नवीन संसद भवनाच्या उद्घाटन समारंभावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षासह 19 विरोधी पक्षांनी बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.

दरम्यान, आज अॅड. सीआर जया सुकीन यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. याचिकेवर उद्या न्यायमूर्ती जे. के. माहेश्वरी आणि न्यायमूर्ती पी. एस. नरसिंम्हा यांच्या खंडपीठापुढे सुनावणी होणार आहे.