मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरू निवडीआधीच नावावरून वाद

मुंबई विद्यापीठाच्या नवीन कुलगुरूंची निवडीआधीच कुलगुरू पदासाठी आलेल्या नावांवरून वाद समोर आले आहेत. कुलगुरू पदासाठी अंतिम पाच नावांच्या उमेदवारांपैकी माजी प्र-कुलगुरू रवींद्र कुलकर्णी यांच्या नावावर प्राध्यापक आणि विद्यार्थी संघटना यांनी जोरदार आक्षेप घेतला आहे.

मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरू पदासाठी निवड समितीने पाच नावे निश्चित केली असून त्यांच्या अंतिम मुलाखती 26 मेपर्यंत होण्याची शक्यता आहे. निश्चित करण्यात आलेल्या पाच नावांपैकी मुंबई विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू रवींद्र कुलकर्णी यांचा नवीन कुलगुरूच्या अंतिम पाच जणांच्या यादीत नाव आल्याने त्यावर अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षणिक महासंघ तसेच मुक्ता प्राध्यापक संघटनेने आक्षेप घेत त्यांची राज्यपालांनी कुलगुरू म्हणून निवड करू नये अशी मागणी केली आहे.

26 मे रोजी मुलाखत घेताना त्यांच्या नावाचा विचार करू नये. माजी प्र-कुलगुरू कुलकर्णी यांच्यावर सर्वोच्च न्यायालयाने काही आक्षेप नोंदवले असून त्यांच्या कारभारासंदर्भातही बरेच वाद आहेत. विद्यार्थ्यांच्या हिताच्या पैशाचा गैरवापर करत त्यांनी प्रकुलगुरू पदाच्या काळात 30 लाख रुपयांची गाडी घेतली होती. त्याची चौकशी अद्याप होऊ शकली नाही, त्यात ते विशिष्ट संघटनेच्या जवळचे असल्याने त्यांनी गैरफायदा घेऊन कुलगुरूपदापर्यंत पोहोचण्यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न करत असल्याचा आरोपही संघटनेने केला आहे. मुक्ता संघटनेचे सुभाष आठवले यांनी यासंदर्भात तक्रार अर्ज राज्यपाल यांच्याकडे केला आहे.

काही नावांना शिक्षक संघटनेचा आक्षेप
निश्चित करण्यात आलेल्या पाच नावांपैकी मुंबई विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू रवींद्र कुलकर्णी, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील भौतिकशास्त्र विभागाचे प्राध्यापक सुरेश गोसावी, कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठातील जैवतंत्रज्ञान विभागाच्या प्रमुख ज्योती जाधव, भाभा ऑटोमिक संशोधन केंद्राच्या शास्त्रज्ञ अर्चना शर्मा, बनारस हिंदू विद्यापीठातील राज्यशास्त्र विभागातील प्राध्यापक तेजप्रताप सिंग ही पाच नावे अंतिम करण्यात आली असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली.