पवित्र भिंतीसमोर मॉडेलचे नग्न फोटोशूट, जगभरात खळबळ

सामना ऑनलाईन । जेरूसलेम

जेरुसलेममध्ये ज्यू धर्मियांच्या पवित्र भिंतीसमोर नग्न फोटोशूट केल्याने एक मॉडेल वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. बेल्जियमच्या या मॉडेलने ज्यू धर्मियांसाठी श्रद्धेचा विषय असलेल्या वेस्टर्न वॉल किंवा वेलिंग वॉलसमोर नग्न होत फोटो काढले यामुळे जगभरात खळबळ उडाली आहे. मेरिसा पापेन असे या मॉडेलचे नाव आहे.

मेरिसाने या आधीही इजिप्तमधील एका प्राचीन मंदीरात असेच फोटोशूट केले होते. यासाठी तिने जेलमध्ये जावं लागलं होतं.  ” द वॉल ऑफ शेम ” या मथळ्याखाली या मॉडेलने तिचे फोटो वेबसाईटवर प्रसिद्ध केले आहेत. मेरिसाने वेबसाईटवर लिहलेल्या पोस्टमध्ये लिहीलंय की, ‘जगामध्ये व्यक्तिस्वातंत्र्य हे अत्यंत दुर्मिळ आणि बहुमूल्य गोष्ट बनली असून या जगाला मी माझा व्यक्तिगत धर्म दाखवू इच्छिते’ इजिप्तमध्ये केलेल्या फोटोशूटनंतर माझ्या मनातील धर्म आणि राजकारणातील सीमारेषा पुसट झाली आहे’ असं तिने पोस्टमध्ये लिहलं आहे.

मेरिसाने सांगितल की, मी मे महिन्यात तीन दिवसांसाठी जेरुसलेम येथे गेले होते. योगायोगाने तेव्हा जेरुसलेमचा ७०वा स्थापना दिवस होता. याचेच औचित्य साधून मेरिसाने इस्रायलचा झेंडा आपल्या अंगावर गुंडाळलेला एक फोटो प्रसिद्ध केला होता. मेरिसाने दुसराही फोटो प्रसिद्ध केला ज्यात तिने पवित्र पश्चिमी भिंतीच्या समोर नग्न होत पोज दिली आहे. पश्चिमी भिंत किंवा वेलिंग वॉल या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या पवित्रस्थळी काढलेल्या या नग्न फोटोंमुळे ज्यू धर्मीय भयंकर संतापले आहेत.

मेरिसाच्या फोटोवर अनेकांनी सडकून टीका केली आहे. मेरिसाने अन्य पवित्र स्थळांऐवजी ज्यू लोकांच्या पवित्र भिंतीसमोरच हे नग्न फोटोशूट का केलं असा अनेकांनी प्रश्न विचारला आहे. मेरिसाने ‘द टाइम्स ऑफ़ इसराइल’ वेबसाइटला या वादाबाबत तिची प्रतिक्रिया कळवली आहे. या प्रतिक्रियेमध्ये तिने म्हटलं आहे की माझा कोणाच्याही भावना दुखावण्याचा उद्देश नव्हता, तिथे फोटो चांगले येत असल्यामुळे मी तेथे फोटो काढले.

आपली प्रतिक्रिया द्या