मराठी शाळांमधील पालक-शिक्षकांचे महासंमेलन

फोटो प्रातिनिधीक

सामना प्रतिनिधी । मुंबई

मराठी अभ्यास केंद्राच्या वतीने मराठी शाळांमधील पालक आणि शिक्षकांचे महासंमेलन लवकरच आयोजित करण्यात येणार आहे. यंदाच्या संमेलनात वांद्रे ते बोरिवली भागांतील शाळांना निमंत्रण देण्यात येणार असून या संमेलनाच्या नियोजनाची बैठक शनिवार, 8 सप्टेंबरला सायंकाळी 4.30 वाजता गोरेगाव पश्चिम येथील महाराष्ट्र विद्यालयात होणार आहे.

मराठी शाळांमध्ये शिकणाऱया विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीत आणि शाळांच्या सक्षमीकरणासाठी पालकांचा सक्रिय सहभाग कसा वाढवता येईल या भूमिकेतून मराठी अभ्यास केंद्र आणि इतर संघटनांनी या संमेलनाचे आयोजन केले आहे. सुप्रसिद्ध अभिनेत्री चिन्मयी सुमित या पालक महासंघाच्या आणि ओघाने मराठी शाळांच्या सदिच्छा दूत आहेत.

यंदा अशाप्रकारचे पालक-शिक्षक महासंमेलन वांद्रे ते बोरिवली या भागांतील पालकांसाठी आयोजित करण्याचे मराठी अभ्यास केंद्राने ठरवले आहे. त्यासाठी संमेलनपूर्व बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला मराठीप्रेमी पालक, शिक्षक, संस्थाचालक आणि मराठी भाषा, समाज, संस्कृतीसाठी काम करणाऱया कार्यकर्त्यांनी जरूर उपस्थित राहावे, असे आवाहन मराठी अभ्यास केंद्राच्या वतीने करण्यात आले आहे. संपर्क – मनोज वेंगुर्लेकर (9322014659), संजीव करमरकर (9082849650).