महागाईची ढगफुटी; स्वयंपाकाचा गॅस सात रुपयांनी महागला

51
प्रातिनिधीक फोटो

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

नोटाबंदीचा बार फुसका निघाल्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला फटका बसला आणि जीडीपी ५.७ टक्क्यांपर्यंत खाली आला. मात्र याचा भार आता सामान्य जनतेवर टाकण्यात येत असून ऐन सणासुदीत महागाईची वाटचाल उच्चांकी दिशेने सुरू आहे. घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरच्या किमतीत ७ रुपयांनी वाढ केली आहे, तर विनासबसिडी सिलिंडर ७३.७० रुपयांनी महागला आहे. पेट्रोलच्या दरामध्ये सातत्याने वाढ होत आहे. पेट्रोल ७८ रुपयांवर गेले असून ३ वर्षांतील हा उच्चांकी दर आहे.

मार्च २०१८पर्यंत गॅस सिलिंडरची सबसिडी (सरकारी अनुदान) बंद करण्याची घोषणा केंद्र सरकारने केली होती. त्यामुळे दर महिन्याला ऑगस्टपासून ४ रुपये सिलिंडर महाग करण्यात येणार होते. परंतु १ ऑगस्टला इंधन कंपन्यांनी गॅस सिलिंडरची किंमत २.३९ रुपयांनी वाढविली. त्यामुळे सप्टेंबरमध्ये सिलिंडर ७ रुपयांनी महाग केले आहे. मात्र गणेशोत्सवानंतर नवरात्र, दसरा, दिवाळी हे महत्त्वाचे सण आहेत. ऐन सणासुदीलाच गॅसदरवाढीचा भडका उडाल्यामुळे सामान्य जनतेच्या त्रासात आणखी भरच पडणार आहे.

पेट्रोलच्या दरवाढीचा भडका
१६ जूनपासून दररोज पेट्रोल आणि डिझेलच्या दरांचा आढावा घेण्याचे धोरण सरकारने सुरू केले पण याचा फटका जनतेला बसत आहे. पूर्वी दर महिन्याच्या १ आणि १५ तारखेला पेट्रोल-डिझेलचे सुधारित दर जाहीर व्हायचे. आता रोज नवीन दर जाहीर करताना बहुतांशी वेळा दरवाढच केली जात आहे. रोज १५ ते २० पैशांनी दरवाढ होते. जुलैपासून गेल्या दोन महिन्यांत पेट्रोल सहा रुपयांनी महागले तर डिझेल ३.७० रुपयांनी वाढले आहे. ऑगस्ट महिन्याचा विचार केला तर पेट्रोलच्या दरात ३.७३ रुपयांनी वाढ झाली. पुण्यात १ ऑगस्टला पेट्रोलचा दर ७४.५० रुपये लिटर होता तर १ सप्टेंबरला पेट्रोलचा दर ७८.२३ रुपये आहे. पेट्रोल, डिझेलची ही तीन वर्षांतील उच्चांकी दरवाढ आहे.

ठळक मुद्दे
– देशात १८.११ कोटी ग्राहकांना सबसिडी गॅस सिलिंडरचा पुरवठा होतो. त्यात २.६ कोटी गरीब महिलांना मोफत सिलिंडर दिले जाते.
– देशात २.६६ कोटी ग्राहकांना विनासबसिडी सिलिंडर खरेदी करावे लागते. यापुढे ३१ मार्च २०१८ पूर्वी गॅस सबसिडी पूर्णपणे बंद केली जाणार आहे. त्यामुळे सर्वांनाच विनासबसिडी सिलिंडर खरेदी करावे लागेल.
– गॅसप्रमाणेच रॉकेलची सबसिडी बंद केली जाणार आहे. त्यामुळे दरमहिन्याला प्रतिलिटर २५ पैशांनी रॉकेल महाग होत आहे. १ जुलै २०१६ला मुंबईत रॉकेल १५ रुपये लिटर होते. आता २२.२७ रुपये प्रतिलिटर आहे.

वर्षभरात सिलिंडर ६८ रुपयांनी महागले
गॅसदरवाढीचे चटके बसण्यास गेल्या वर्षी जुलै महिन्यापासून सुरुवात झाली. दर महिन्याला दोन रुपये दरवाढ करण्याचे धोरण सरकारने ठरविले पण जुलै २०१६ ते जुलै २०१७ या वर्षभरात सिलिंडर तब्बल ६८ रुपयांनी महाग झाला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या