
आरबीआयने महाराष्ट्रातील दोन सहकारी बँकांसह देशातील सात सहकारी बँकांना दंडाचा दणका दिला आहे. आरबीआयने वेळोवेळी दिलेल्या निर्देशांचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत तब्बल 1 कोटी 97 लाख रुपयांचा दंड आकारला आहे. त्यामुळे सहकारी बँकिंग क्षेत्राच्या भुवया उंचावल्या आहेत.
देशातील सहकारी बँकांच्या कारभारावर आरबीआयचे नियंत्रण आहे. बँकांनी आपला आर्थिक कारभार कसा चालवावा याबाबत रिझर्व्ह बँकेकडून वेळोवेळी निर्देश दिले जातात. मात्र सदरच्या निर्देशांचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत दंड केला आहे.
उत्तर प्रदेशातील इंडियन मर्कंटाईल को-ऑपरेटिव्ह बँकेला 20 लाखांचा दंड केला आहे. महाराष्ट्रातील झोटोस्ट्रीयन को-ऑपरेटिव्ह बँकेला 1 कोटी 15 लाख रुपये, भारत को-ऑपरेटिव्ह बँकेला 50 लाखांचा दंड लावला आहे. तामीळनाडूतील जिल्हा मध्यवर्ती को-ऑपरेटिव्ह बँकेला 1 लाख रुपये, आंध्र प्रदेशातील कुम्बुम को-ऑपरेटिव्ह बँकेला 3 लाख रुपये, कर्नाटकातील चित्तूर को-ऑपरेटिव्ह बँकेला 6 लाखांचा तर नॅशनल को-ऑपरेटिव्ह बँकेला 2 लाखांचा दंड लावला आहे.