मालमत्तेची खोटी माहिती दिल्यानं नगरसेवकपदाला उच्च न्यायालयात आव्हान

49

सामना ऑनलाईन । नागपूर

प्रभाग क्रमांक १७ (ड)चे नगरसेवक व महापालिकेच्या धंतोली झोनचे नवनियुक्त सभापती प्रमोद चिखले यांच्या निवडीला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. दोन घर असताना एकाच घराच्या मालमत्ता कराचा उल्लेख त्यांनी मनपा निवडणुकीत उमेदवारी अर्जात केला होता. शपथपत्रात खोटी माहिती देऊन चिखले यांनी निवडणूक आयोगाची दिशाभूल केल्याचा आरोप शिवसेनेच्या ‘आयटी’विभागाचे शहर प्रमुख प्रतिक बालपांडे यांनी केला आहे.

बालपांडे यांनी चिखले यांची सदस्यता रद्द करण्यासंदर्भातील निवेदन राज्याचे निवडणूक आयोग, जिल्हाधिकारी व मनपा आयुक्तांकडेदेखील केली आहे़. दरम्यान तक्रार करूनही जिल्हा प्रशासनाने कोणतीच कारवाई केली नसल्यामुळे बालपांडे यांनी उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे़. त्यांनी रिट याचिका दाखल केली आहे़, या याचिकेत चिखले यांच्यावर मालमत्तेची अपुरी माहिती दर्शविल्याचा आरोप आहे़. चिखले यांनी महाल गाडीखाना येथील घराचा शपथपत्रात उल्लेख करीत, मालमत्ता कराची पावती सादर केली. त्यांचे दुसरे घर रेशीमबाग चंदननगर येथे देखील आहे. या घराचे क्रमांक ६७० असे आहे. या घराची माहिती त्यांनी दडवून ठेवत शपथपत्रात मालमत्तेची माहिती अपूर्ण दिल्यामुळे व माहिती लपविल्यामुळे त्यांची नगरसेवक म्हणून झालेली निवड रद्द करावी अशी याचिकेत मागणी करण्यात आली.

आपली प्रतिक्रिया द्या