नागपूरमध्ये पोलीस दक्ष, अधिवेशनासाठी कडेकोट बंदोबस्त

सामना ऑनलाईन । नागपूर

विधीमंडळ हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्‍वभूमीवर उपराजधानीत कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात येणार आहे. एकूण पाच हजार अधिकारी, कर्मचाऱ्यांवर सुरक्षेची मदार राहणार आहे. यंदा तुलनेने कमी मनुष्यबळ मागविण्यात आले असले तरी अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने गर्दीवर नियंत्रण, सुरक्षा आणि गुन्हेगारीवर वचक ही जबाबदारी पार पाडण्यात येईल, असा विश्‍वाय पोलिस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशन यांनी शुक्रवारी पत्रकारपरिषदेत व्यक्त केला.

यंदा बंदोबस्तासाठी बाहेरून केवळ दोन हजार ७३० अधिकारी व कर्मचारी मागविण्यात आले आहेत. त्यात एसआरपीच्या आठ तुकड्या, फोर्स वनचे एक युनीट, क्‍युआरटीचे चार व बॉम्ब शोधक व नाशक पथकाच्या वीस पथकांचा समावेश आहे. पंधरा अधीक्षक दर्जाचे अधिकारी आणि ४३० इतर अधिकाऱ्यांचाही यात समावेश आहे. याशिवाय होमगार्डसह शहरातील सुमारे दोन हजार २०० कर्मचारीही सुरक्षा व्यवस्थेत राहतील. विधानभवन, राजभवन, रवीभवन, आमदारनिवास, नागभवन, व्हीआयपींच्या वास्तव्याची ठिकाणे यासह पाच मोर्चे पॉईंट व पटवर्धन मैदान येथे पोलिस दल नियुक्त करण्यात येणार आहे.

अत्याधुनिक तंत्राचा वापर

अधिवेशनादरम्यान कोणत्याही अप्रिय घटनांना आळा घालण्यासह मोर्चेकरी व आंदोलकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी अत्याधुनिक तंत्राचा वापर करण्यात येईल. दोन ड्रोन कॅमेरे, हल्मेट कॅमेरे व २२६ व्हिडीओ कॅमेरे तसेच स्मार्ट सिटी योजनेंतर्गत लागलेल्या सीसीटिव्ही कॅमेऱ्यांच्या मदतीने गर्दीवर लक्ष केंद्रीत करण्यात येईल. कमी मणुष्यबळ असल्याने दर दिवशी मोर्चा पॉईंटवर आढावा घेऊन गरजेनुसार कर्मचाऱ्यांची संख्या कमी जास्त केली जाईल. कमी श्रमात जास्त यश मिळविण्याचा प्रयत्न असल्याचे डॉ. वेंकटेशन यांनी सांगितले.

मेट्रो व रस्तेबांधकाम मोठे आव्हान

विधान भवनावर यंदा निघणाऱ्या मोर्चांची संख्या ९०च्या घरात असण्याची शक्‍यता आहे. आतापर्यंत ५३ जणांनी अर्ज सादर केले असून ४० संघटनांना परवानगी देण्यात आली आहे. शहरात जागोजागी मेट्रो व सिमेंट रस्त्याची कामे सुरू आहेत. यामुळे रस्ते अवरुद्ध झाले आहेत. कमी जागेतून मोर्चाचे योग्य संचालन करणे हे मोठे आव्हान असल्याची कबुली पोलिस आयुक्तांनी दिली.

मोर्चादरम्यान मेट्रोची कामे बंद

मोर्चेकऱ्यांच्या दृष्टीने वर्धा रोड आणि मुंजे चौक ही महत्त्वाची ठिकाणे आहेत. या ठिकाणी मेट्रोची कामे सुरू आहेत. यामुळे रस्ते अवरुद्ध झाले असून कमेही सुरू असतात. अनुचित घटना घडू नये यासाठी मोर्चाच्यावेळी संबंधित ठिकाणी मेट्रोची कामे बंद ठेवण्यात येणार आहे. याशिवाय महत्त्वाच्या ठिकाणी योग्य उपाययोजना करून रस्ते मोकळे करून घेण्यात येणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या