
केंद्र सरकारने आज कोरोना प्रतिबंधक बुस्टर डोस म्हणून कोर्बेव्हॅक्स या लसीला मंजुरी दिली आहे. बायोलॉजिकल-ई कंपनीने बनवलेला हा बुस्टर डोस याआधी कोव्हिशिल्ड, कोव्हॅक्सिन लस घेतलेल्या ज्येष्ठ नागरिकांना देता येणार आहे.
संपूर्ण देशी बनावटीचे असलेली कोर्बेव्हॅक्स ही लस सध्या देशातील 12-14 वयोगटातील मुलांना दिली जात आहे. नॅशनल टेक्निकल अॅडव्हायझरी ग्रुप ऑफ इम्युनायझेशनने (एनटीएजीआय) 2 ऑगस्ट रोजी कोर्बेव्हॅक्सचा बुस्टर डोस म्हणून वापर करण्याबाबत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडे शिफारस केली होती. त्यानुसार सरकारने त्याला मंजुरी दिली आहे. ज्या व्यक्तीने कोव्हिशिल्ड किंवा कोव्हॅक्सिन लस घेऊन सहा महिने झाले आहेत, त्यांना सदरचा बुस्टर डोस देता येणार असल्याचे आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.