कोरोना- बीडमध्ये 29 पोलिसांसह 35 नव्या रिपोर्टची प्रतीक्षा

1142

कोरोनाचा तगडा मुकाबला करण्यात बीड जिल्ह्याला यश मिळाले आहे. चार सीमेवरील जिल्ह्यात कोरोना दाखल झाला असताना सुदैवाने अजून एकही रुग्ण सापडलेला नसला तरी रविवारी रात्री उशिरा पाठवलेल्या स्वॅबच्या नमुन्यांचे अहवाल सोमवारी प्राप्त होतील. 29 पोलिसांसह, 4 शिक्षक, आरोग्य कर्मचारी आणि आष्टीतील 2 जण अशा 35 जणांच्या अहवालाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

बीड जिल्ह्याच्या भोवती असणाऱ्या नगर, संभाजीनगर, जालना, धाराशिव या जिल्ह्यांमध्ये कोरोनाची लागण झालेले रुग्ण आढळून आल्याने जिल्हावासीयांना अधिक सतर्कता बाळगणे आवश्यक झाले आहे. प्रशासनाने केलेल्या अजोड कामगिरीमुळे बीड जिल्ह्यात अद्याप तरी एकही रुग्ण आढळून आलेला नाही. रविवारी दुपार नंतर आठ कोरोनाग्रस्त तबलिगी रुग्णांच्या संपर्कात आलेल्या गेवराई अन चौसाळा चेक पोस्ट वरील 29 पोलिसांचे स्वॅब नमुने पाठवण्यात आले.

या 29 जणांसह अजून सहा नमुनेही पाठवले आहेत. त्यात चार कर्मचारी आहेत, तर दोन आष्टीचे रुग्ण आहेत. आष्टीच्या दोघांना रविवारी रात्री तातडीने नगरला पाठवण्यात आले आहे. एकूण 35 जणांच्या अहवालाची बीड जिल्ह्याला प्रतीक्षा आहे. दरम्यान दिवसरात्र आपले कर्तव्य जबाबदारीने पार पाडणाऱ्या 29 पोलिसांचेही अहवाल निगेटिव्ह यावेत यासाठी जिल्हावासीयांनी सदभावना व्यक्त केल्या आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या