कोरोनाचे ‘बेळगाव कनेक्शन’ पडले महागात..! आजऱ्यातील एका कुटुंबाची वाताहत, चौघांचा मृत्यू

599

कोरोनाकाळात सोशल डिस्टन्सिंग न राखल्यामुळे एका कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाल्याची घटना आजरा येथे घडली आहे. येथील एका प्रसिद्ध कुटुंबातील चार जण कोरोनाने दगावले असून त्या आधी त्यांनी बेळगाव येथे कोरोना झालेल्या नातेवाईकाला भेट दिल्याची माहिती मिळत आहे.

आजरा शहरातील व्यवसाय, राजकारण, संस्थाकारण आणि समाजकारणात अग्रेसर मानले जाणारे हे कुटुंब होते. या कुटुंबातील बेळगावस्थित बहिणीचा नवरा कोरोनाने आजारी पडला होता. मात्र, अत्यावश्यक असेल तरच घराबाहेर पडा, या सूचनेला न जुमानता या कुटुंबातील एक भाऊ मोटारीने बेळगावला गेला. मेहुण्याच्या देखभालीमध्ये हयगय होतेय, म्हणून स्वतःच्या पुढाकाराने त्यास उपचारासाठी आजऱ्याला घेऊन आला. या दरम्यान झालेल्या अजाणतेपणीच्या दुर्लक्षामुळे बेळगावचा कोरोना आजऱ्यात संक्रमित झाला आणि कुटुंबातील मुला-माणसांत तो पसरला.

यातून संसर्ग झालेल्या कुटुंबियांच्या संपर्कातून बाधा वाढत गेली आणि इतर अनेकांना कोविड केंद्राची पायरी चढावी लागली. परिसर प्रतिबंधित झाला. सर्वांसह शहराची आणि प्रशासनाची फरफट वाढली. याशिवाय संबंधितांसह उर्वरितांवरही सतत तणावाखाली राहण्याची वेळ आली. या कुटुंबातील पाच वर्षे वयापासून ते सत्तरी गाठलेल्या आणि स्थानिक स्वराज्य संस्थेतील सदस्य महिला व पुरुषासह वीस-पंचवीस जणांवर स्वॅब तपासण्याची, विलगिकरणात राहण्याची आणि उपचार करून घेण्याची वेळ आली. त्यातील बहुतांश उपचाराअंती बरे होऊन घरी परतले. मात्र, याच कुटुंबातील सख्ख्या भावा-बहिणीबरोबरच तिचा नवरा आणि मुलग्याचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या