रुग्णांमध्ये सकारात्मक ऊर्जेचा स्रोत निर्माण करणारी कोरोना ब्रिगेड टीम

समाजातील तरुण-तरुणींची व्हॉट्सअॅप ग्रुपच्या माध्यमातून लग्न जमवत असताना कोरोनाचा संकट काळ सुरू झाला. आता कोरोनाच्या संसर्ग आणि चिंता या दोन्हींनी ग्रासलेल्या कोरोना रुग्णाला सकारात्मक ऊर्जेचा स्रोत देण्याचे काम ‘जन्मबंध कोरोना ब्रिगेड’ या उपक्रमाच्या माध्यमातून पालिकेतील एका निवृत्त कर्मचाऱयाने सुरू केले आहे. रुग्णांना मोबाईलवर गाणी, कविता, गोष्टी, चित्रपटातील संवाद आणि सिद्धपुरुषांच्या गोष्टी सांगून कोरोनावर सकारात्मक ऊर्जेने मात करण्यास शिकवले जात आहे.

मुंबई महानगरपालिकेतून दहा वर्षांपूर्वी निवृत्त झालेले प्रभाकर मोरे यांनी सहा वर्षांपूर्वी सोनार समाजातील तरुण-तरुणींची लग्नं जमवण्यासाठी ‘जन्मबंध’ नावाचा व्हॉट्सअॅप ग्रुप तयार केला. ‘जन्मबंध मुंबई-1’, ‘जन्मबंध मुंबई-2’ असे वेगवेगळ्या गावांसाठी ‘जन्मबंध’ नावाचे 211 व्हॅट्सअॅप ग्रुप केले. आता या ग्रुपचे 30 हजार सदस्य आहे. आतापर्यंत जन्मबंधच्या माध्यमातून 2001 लग्नं जमली आहेत.

विवाह जमवत असताना कोरोनाचे संकट सुरू झाले. लोक या संकटामुळे त्रस्त झाले आहेत. त्यामुळे त्यांना मदत करण्याची इच्छा प्रभाकर मोरे यांच्यात निर्माण झाली. त्यातून त्यांनी ‘जन्मबंध कोरोना ब्रिगेड’ टीम सुरू केली. या उपक्रमाचे त्यांनी त्यांच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर आवाहन केले तेव्हा अगदी डॉक्टरांपासून निसर्गेपचार, योगा, रेकी अशा विविध क्षेत्रांत काम करणाऱया 22 स्वयंसेवकांची टीम तयार झाली. आपल्या जवळचा कोणी कोरोनाचा रुग्ण असेल तर त्याची माहिती पाठवून देण्याचे आवाहन ग्रुपवर केले.

ग्रुपच्या सदस्यांनी कोरोना रुग्णांची माहिती कळवली. मग या कोरोना ब्रिगेडच्या सदस्यांनी रुग्णांना फोन केले. त्यांचे मनोबल वाढवण्याचे काम सुरू झाले, त्यांच्या आवडीनिवडी विचारल्या, त्यांना बोलते केले. कोरोना हा विषय टाळून सर्व विषयांवर ‘जन्मबंध कोरोना ब्रिगेड’च्या सदस्यांनी गप्पा मारल्या.

काही रुग्णांनी गाण्यांची आवड सांगितली. त्यांच्या आवडीनुसार त्यांना गाणी ऐकवली. इसापनितीच्या गोष्टी, चित्रपटातील संवाद ऐकवले. स्वामी समर्थांचा संदेश सांगितला.

दररोज किमान चार जणांशी गप्पा मारून त्यांना कोरोनाचा विसर पाडण्याचे काम सुरू आहे. रुग्ण बरा झाल्यावर या ग्रुपच्या सदस्यांना आवर्जून फोन करतात. औषधांसोबत तुम्ही दिलेल्या धीरामुळे आम्ही कोरोनातून बरे झाल्याचे आवर्जून सांगतात.

आपली प्रतिक्रिया द्या