मिरज शासकीय रुग्णालयात बालकांसाठी कोरोना सेंटर

covid-center

कोरोनाची तिसरी लाट लहान मुलांना धोकादायक असल्याबाबत तज्ञांचे मत आहे. त्या अनुषंगाने येणाऱ्या संभाव्य कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुले बाधित झाली तर त्यांच्यावर तातडीने उपचार होण्यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय मिरज येथील बालरुग्ण विभागात 50 आयसीयू बेड्सचे लहान मुलांसाठी कोरोना सेंटर सुरू करण्याची तयारी पूर्ण झाली आहे. यासाठी आत्तापर्यंत अंदाजित दोन कोटी रुपये इतका खर्च झाला आहे. तसेच नवीन 21 केएल क्षमतेच्या ऑक्सिजन टँकची उभारणीही पूर्णत्वाकडे आली आहे. त्यासाठीही 60 लाख रुपये खर्च झाल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी दिली.

जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय मिरज येथे भेट देत विविध विभागांची पाहणी केली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी अधिष्ठाता डॉ. सुधीर नणंदकर, कार्यकारी अभियंता संतोष रोकडे, अतिरिक्त अधिष्ठाता डॉ. रूपेश शिंदे, बालरोगतज्ञ डॉ. शिशिर मिरगुंडे, शीतल शहा आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी डॉ. चौधरी म्हणाले, कोरोनाची संभाव्य तिसरी लाट येऊ नये, यासाठी प्रयत्नशील आहोतच, पण ती लाट आली तरी त्याला तोंड देण्यासाठी आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी प्रशासन काम करीत आहे. याअंतर्गतच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय मिरज येथे 21 के.एल. क्षमतेचा नवीन ऑक्सिजन टँक कार्यान्वित होणार आहे. यापूर्वीही 6 केएलचे तीन ऑक्सिजन टँक कार्यान्वित आहेत. यामधून 124 जम्बो सिलिंडर प्रतिदिन भरण्यात येत आहेत. नवीन 21 के.एल. प्लाण्ट कार्यान्वित झाल्यानंतर 250 जम्बो सिलिंडर प्रतिदिन भरण्याची सोय उपलब्ध होणार आहे. त्याचबरोबर सद्यःस्थितीत 200 सिलिंडर शिल्लक आहेत. यामुळे सर्व वॉर्डना योग्य दाबाने ऑक्सिजनचा पुरवठा करणे सोयीस्कर होणार आहे.

सद्यस्थितीत कोरोनाबाधितांवर रुग्णालयांमध्ये उपचार होत आहेत. तथापि, पोस्ट कोविड रुग्णांचेही दिवसेंदिवस प्रमाण वाढत असून त्यांच्यावरही उपचार होणे आता गरजेचे झाले आहे. त्यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात पोस्ट कोविड उपचार सेंटर सुरू करण्याबाबत कार्यवाही व्हावी, असा आदेश त्यांनी दिला.

नवीन ट्रान्सफॉर्मरसाठी प्रस्ताव तयार करा – जिल्हाधिकारी

कोरोनाकाळात रुग्णालयाचे अद्ययावतीकरण झाले असून, विविध प्रकारच्या मशिनरी येथे कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. त्यासाठी लागणारा वीजपुरवठा मात्र पूर्वीचाच असल्याने सद्यस्थितीतील वीजपुरवठय़ावर ताण येण्याची शक्यता आहे. त्यासाठी नवीन ट्रान्सफॉर्मर रुग्णालयात बसविण्यासाठी प्रस्ताव तयार करावा. यासाठी लागणारा आवश्यक निधी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून देण्यात येईल. त्याचबरोबर केंद्र सरकारकडून रुग्णालयासाठी एक ऑक्सिजन प्लाण्ट मंजूर झाला असून, तो उभारण्यासाठी जागेची निश्चिती करावी. रुग्णालयास लागणारी साधनसामग्री, तसेच उपकरणांसाठी लागणाऱ्या निधीचा प्रस्ताव प्रशासनाकडे सादर करावा, असा आदेशही जिल्हाधिकारी डॉ. चौधरी यांनी दिला.

आपली प्रतिक्रिया द्या