#corona संकटातही चीनची राजकीय खेळी, 100 हिंदुस्थानींच्या विमानाला परवानगीसाठी विलंब

1446
प्रातिनिधिक फोटो

चीनमध्ये कोरोनासारख्या महाभयंकर संकटाने थैमान घातलं आहे. चीनमध्ये आतापर्यंत कोरोनाने मरण पावलेल्यांची संख्या दोन हजारांहून जास्त झाली आहे. पण, अशा परिस्थितीतही चीन आपली राजकीय भूमिका सोडायला तयार नसल्याचं चित्र आहे. कारण, 100 हिंदुस्थानी नागरिक अद्यापही चीनमध्येच अडकून पडले असून त्यांना परतीसाठी लागणाऱ्या परवानगीसाठी चीन टाळाटाळ करत आहे.

आजतकने दिलेल्या वृत्तानुसार, कोरोनाचं केंद्र असलेल्या वुहान शहरात आतापर्यंत 45,346 जण कोरोनाग्रस्त आहेत. त्याखेरीज निरनिराळ्या देशांचे नागरिकही या संकटामुळे चीनमध्येच अडकून पडले आहेत. त्यात हिंदुस्थानी नागरिकांचाही समावेश आहे. या नागरिकांना परत आणण्यासाठी हिंदुस्थानकडून विशेष विमानही पाठवण्यात येणार आहे. पण, या नागरिकांना देश सोडण्यासाठी लागणारी परवानगी चीनने अद्याप दिलेली नाही. हिंदुस्थानच्या नागरिकांना आणण्यासाठी इथून उडणारं C-17 हे विमान 20 फेब्रुवारी रोजी चीनच्या दिशेने उड्डाण करणार होतं. मात्र, चीनकडून परवानगी अथवा तत्सम कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे चीन जाणूनबुजून ही राजकीय खेळी खेळत असल्याची चर्चा सुरू आहे.

दरम्यान, चीनने मात्र या आरोपांचं खंडन केलं असून चीन अशा कोणत्याही प्रकारे अडवणूक करत नसल्याचं म्हटलं आहे. दोन्ही देशांचे अधिकारी यावर चर्चा करत असून अंतिम निर्णय लवकरच येणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या