धक्कादायक! एप्रिलपासूनच कोरोनाचा सामूहिक संसर्ग! आरोग्य मंत्रालयाने पाडले मोदी सरकारला तोंडघशी

1903
फोटो- प्रातिनिधीक

देशात कुठेही कोरोनाचा सामूहिक संसर्ग झाला नसल्याचा छातीठोक दावा मोदी सरकारने केला आहे. मात्र, आरोग्य मंत्रालयानेच मोदी सरकारला तोंडघशी पाडत आपल्या जुलै महिन्याच्या अहवालात एप्रिलपासूनच कोरोनाचा सामूहिक संसर्ग देशाच्या विविध भागांत झाल्याचे स्पष्ट म्हटले आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जुलै महिन्यात ‘सार्वजनिक औषधी आणि विशेष मानसिक आरोग्य’ याविषयी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली. या अहवालात एप्रिलमध्येच हिंदुस्थानात कोरोनाचा मर्यादित सामूहिक संसर्ग सुरू झाला, असा स्पष्ट उल्लेख केला आहे. या महामारीचा प्रसार कसा होतोय, हे कोणाच्याही लक्षात येत नसल्याचेही या अहवालात म्हटले आहे. आश्चर्य म्हणजे, ‘आयसीएमआर’चे डॉ. बलराम भार्गव यांनी 11 जून रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ‘सेरो’ सर्व्हेची माहिती देताना देशात कुठेही सामूहिक संसर्ग नसल्याचे स्पष्ट सांगितले होते. शहरी भाग, तसेच कंटेन्मेंटमध्ये काही प्रमाणात असे दिसत असले, तरी त्याला सामूहिक संसर्ग म्हणता येत नाही, असा दावा डॉ. भार्गव यांनी केला होता.

सामूहिक संसर्ग कसा होतो?
जागतिक आरोग्य संघटनेने सामूहिक संसर्गाचे निकष ठरवून दिले आहेत. संक्रमणाचा स्रोत सापडलाच नाही, कोण संक्रमित आहे आणि तो कुठे कुठे संक्रमण फैलावून आला आहे, याचा शोध लागला नाही तर तो ‘सामूहिक संसर्ग’ समजला जातो.

आपली प्रतिक्रिया द्या