दादर, धारावी, माहीमसाठी 200 ऑक्सिजन खाटांचे कोरोना हेल्थ सेंटर सुरू

423

पालिकेच्या जी/उत्तर विभागातील धारावी येथील महाराष्ट्र निसर्गोद्यानात 200 बेडचे कोरोना हेल्थ सेंटर सुरू करण्यात आले आहे. ऑक्सिजन सुविधेसह बेड उपलब्ध असल्यामुळे दादर, धारावी आणि माहीमसह जी/उत्तर विभागातील कोरोनाबाधितांसाठी मोठी सुविधा उपलब्ध झाली आहे.

मुंबईत कोरोनाबाधित रुग्णांसाठी खाटांची कमतरता पडू नये यासाठी पालिकेच्या माध्यमातून वाढीव कोरोना हेल्थ सेंटर सुरू करण्यात येत आहेत. यामध्ये जी/उत्तर विभागात ऑक्सिजन बेडची सुविधा असलेले कोरोना केंद्र सुरू करण्यात आले. पालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली हे अद्ययावत कोरोना केंद्र सुरू करण्यात आले आहे. या ऑक्सिजनयुक्त कोरोना सेंटरसाठी सुप्रसिद्ध अभिनेता अजय देवगण यांच्या ‘एनवाय’ फाऊंडेशन आणि आपत्ती व्यवस्थापनासह आरोग्य क्षेत्रातील जगप्रसिद्ध अमेरिकेअर्स यांनी ऑक्सिजन पुरवठय़ासाठी सहकार्य केले आहे. जी/उत्तर विभागाचे सहायक आयुक्त किरण दिघावकर यांच्यासह विभागतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नांतून हे केंद्र उभारण्यात आले आहे.

वॉटरप्रूफ उभारणी, सीसीटीव्हीची नजर

सुमारे 2200 चौरस फूट क्षेत्रावर हे कोरोना केंद्र उभारण्यात आले आहे. विशेष म्हणजे हे केंद्र वॉटरप्रूफ राहणार आहे. मध्यम स्वरूपाची बाधा असणाऱ्यांना या केंद्राचा लाभ होणार आहे. रुग्णांसाठी अद्ययावत व्यवस्थेसह गरम पाणी, अल्पोपहार, जेवण, दूध असा पोषक आहार दिला जाणार आहे.

या ठिकाणी रुग्णसेवेसाठी तीन पाळ्यांमध्ये 10 डॉक्टर्स, 15 नर्स आणि आरोग्य कर्मचारी तैनात राहणार आहेत. तसेच मदतीसाठी 70 कर्मचारीही नेमण्यात आले आहेत. या केंद्रासाठी 24 तास स्वतंत्र रुग्णवाहिकाही उपलब्ध राहील. शिवाय सुरक्षेसाठी सीसीटीव्हीची नजरही राहणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या