कोरोनाला घाबरू नका, ‘एमपॉवर’मधून पालिका करणार समुपदेशन; 24 तास हेल्पलाइन सुरू

718

कोरोनामुळे घाबरलेल्या आणि नैराश्य आलेल्यांचे पालिकेकडून समुपदेशन केले जाणार आहे. राज्य सरकारच्या सहकार्याने हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. यामध्ये मुंबईकरांसाठी बीएमसी-एमपॉवर वन ऑन वन’ 1800-120-820050 हा टोल-फ्री क्रमांक सुरू करण्यात आला आहे. मराठी, हिंदी आणि इंग्रजी या तीन भाषांमध्ये पालिकेने हेल्पलाईन सुरू केली आहे. ही सुविधा 24 तास सुरू राहणार आहे.

मुंबईसह राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. व्यवसाय, धंदे बंद झाल्याने अनेकजण चिंतेत आहेत. अनेकांना भीती, तणाव आणि चिंतेने नैराश्य आले आहे. या पार्श्वभूमीवर पालिका प्रशासनाने राज्य सरकारच्या सहकार्याने हा उपक्रम सुरू केला आहे. यामध्ये नागरिकांना 24×7 ‘बीएमसी-एमपॉवर वन ऑन वन’ या नावाने ओळखला जाणारा 1800-120-820050 हा टोल-फ्री हेल्पलाइन नंबर सुरू केला आहे. राज्यासह शहरातील नागरिकांना अनुभवी आणि प्रशिक्षित मानसिक आरोग्य समुपदेशकांद्वारे या ठिकाणी सल्ला दिला जाणार आहे. एमपॉवर – द सेंटर, एमपॉवर- द फाऊंडेशन आणि एमपॉवर – द सेल येथील क्लिनिकल सायकोलॉजिस्ट आणि सायकियाट्रिस्ट मानसिक आरोग्यविषयक समुपदेशन करतील.

असा राबवणार उपक्रम
कोरोनामुळे दीर्घकाळाचे क्वारेंटाईन आणि लॉकडाऊन यामुळे चिंतेत पडलेल्यांसाठी हा उपक्रम फायदेशीर ठरणार असल्याचे एमअँपच्या संस्थापक आणि अध्यक्ष नीरजा बिर्ला यांनी सांगितले. या उपक्रमात एमपॉवर टेलिफोनवरील संभाषणे, ऑनलाइन चॅट, व्हिडिओ कॉलिंग यांसारख्या आभासी माध्यमांतून लोकांना या टप्प्यातून बाहेर काढले जाईल. शिवाय पालक, तरूण व्यावसायिक आणि कुटुंबांना दैनंदिन जीवनासाठी विविध प्रकारचे मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

आठ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण
कोरोनाविरोधातील लढ्यात आपला जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. यामध्ये डॉक्टर, नर्स, आया, सुरक्षारक्षक, सफाई कामगार आणि पोलीस अशा आठ शासकीय कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली. याशिवाय आतापर्यंत दोन खासगी डॉक्टर कोरोनाग्रस्त आढळले आहेत. पालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयातील 1 नर्स, 1 सुरक्षारक्षक, 2 डॉक्टर, 1 सफाई कामगार, 1 आया आणि रेल्वेतील व वरळी पोलीस कॅम्पमध्ये राहणाऱ्या दोन पोलीस शिपायांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. यापैकी ईएनटीमधील डॉक्टरच्या दोन्ही चाचण्या निगेटिव्ह आल्या आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या