आता काय होणार! इंग्लंड दौऱ्यावरील हिंदुस्थानी संघातील एका क्रिकेटपटूला कोरोनाची लागण, संख्या वाढण्याची भीती

इंग्लंडमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या पुन्हा एकदा वाढायला लागली आहे. कोरोनाच्या वाढत्या फैलावाचा फटका हिंदुस्थानी संघालाही बसला आहे. एक क्रिकेटपटू हा कोरोनाग्रस्त झाला असल्याची खात्रीशीर माहिती क्रिकबझ या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातमीद्वारे देण्यात आली आहे. हिंदुस्थानचा मुख्य संघ इंग्लंड दौऱ्यावर आहे. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेनंतर संघातील सदस्यांना 3 आठवड्यांचा ब्रेक देण्यात आला होता. या काळात संघातील सदस्य फिरण्यासाठी इंग्लंड आणि स्कॉटलंडच्या विविध भागात गेले होते. या भटकंतीदरम्यान कोरोनाग्रस्त क्रिकेटपटूला बाधा झाली असावी अशी भीती वर्तवण्यात येत आहे.

क्रिकबझने दिलेल्या बातमीत म्हटलंय की आतापर्यंत जरी एकच क्रिकेटपटू बाधित असल्याचं कळालं असलं तरी अन्य काही क्रिकेटपटूंना कोरोनाची बाधा झाली असल्याची शक्यता तूर्तास नाकारता येत नाहीये. कोणत्या क्रिकेटपटूला कोरोनाची बाधा झाली आहे, हे मात्र अद्याप कळू शकलेलं नाहीये. ज्या क्रिकेटपटूला कोरोनाची बाधा झाली आहे तो संघासोबत डरहमला जाणार नसल्याचं सांगण्यात येतंय. डरहमला सराव सामना आयोजित करण्यात आला असून त्यासाठी संघ गुरुवारी डरहमच्या मैदानात उतरणार आहे. इंग्लंड आणि हिंदुस्थानी संघातील कसोटी सामन्यांच्या मालिकेला 4 ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे.

ज्या क्रिकेटपटूला कोरोनाची बाधा झाली आहे त्याने घशामध्ये थोडा त्रास जाणवत असल्याची तक्रार केली होती. यानंतर त्याची तातडीने कोरोना चाचणी करण्यात आली जी पॉझिटीव्ह निघाली. त्याच्या संपर्कात आलेल्या सगळ्यांना 3 दिवसांच्या क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आलं होतं आणि त्यांचा क्वारंटाईन काळ पूर्ण झाला असल्याचंही कळतंय.

इंग्लंडच्या 3 क्रिकेटपटूंसह 7 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह

पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यातील एक दिवसीय सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होण्यापूर्वीच इंग्लंड संघाला मोठा धक्का बसला होता. इंग्लंडच्या संघातील 3 खेळाडूंसह 7 सदस्यांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचं निदान करण्यात आलं होतं. इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट मंडळाने (ईसीबी) ट्वीट करून याबाबतटी माहिती दिली होती. यानंतर या सर्वांना आयसोलेट करण्यात आले आणित्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले होते. याबाबत ईसीबीने माहिती देताना सांगितले की, ‘इंग्लंडच्या क्रिकेट संघातील खेळाडूंसह सात जणांना कोरोनाची लागण झाली आहे. या सर्वांना पब्लिक हेल्थ इंग्लंड, पब्लिक हेल्थ वेल्स आणि ब्रिस्टल लोकल हेल्थ अॅथोरिटीच्या सहयोगाने आणि युके सरकारच्या आयसेलेट प्रोटोकॉलप्रमाणे क्वारंटाईन करण्यात आले आहे. तसेच संघातील अन्य सदस्यांना इतरांच्या संपर्कात येण्यापासून स्वत:ला टाळावे आणि वेगळे राहावे असे आदेश देण्यात आला आहे.’

इंग्लंडचे तीन क्रिकेटपटू व चार सपोर्ट स्टाफ सदस्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर इंग्लंड अॅण्ड वेल्स क्रिकेट बोर्डाने पाकिस्तानविरुद्धच्या मालिकेसाठी निवडण्यात आलेला इंग्लंडचा संपूर्ण संघच बदलून टाकला होता. मात्र त्याचवेळी हिंदुस्थानी क्रिकेटपटूंवर अद्याप कोणतीही बंधने घालण्यात आलेली नाहीत आणि या खेळाडूंच्या सुट्टीत कोणताही अडथळा आणलेला नाहीए, अशी माहिती बीसीसीआयच्या सूत्रांकडून देण्यात आली होती.

आपली प्रतिक्रिया द्या