कोरोनामुळे पतीचे निधन झाल्याचे समजताच पत्नीची आत्महत्या, नंतर कळले ‘तो’ अजूनही जिवंतच

कोरोनामुळे रुग्णालयामध्ये उपचार घेत असलेल्या पतीचे अखेर निधन झाल्याची बातमी घरी येऊन धडकली आणि पत्नीच्या पायाखालची जमीनच सरकली. काय करावे हे क्षणभर समजेना. पतीच्या माघारी आता आपले कसे होणार या भीतीने तिने थेट गळफास घेऊन आत्महत्या केली. पण प्रत्यक्षात ‘ती’ बातमी खोटी होती. पती अजून जिवंत असून त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. मात्र वेळ निघून गेली होती. कारण पतीच्या निधनाचा धक्का सहन न झाल्याने त्या महिलेने आपले आयुष्य संपवले होते. या विचित्र घटनेने संपूर्ण वसईत हळहळ व्यक्त होत आहे.

स्वाती डिसिल्वा असे या दुर्दैवी महिलेचे नाव आहे. वसईच्या मर्सेस गावात डिसिल्वा कुटुंब राहते. विवेक डिसिल्वा (39) हे काही दिवसांपूर्वी परराज्यात जाऊन आले होते. त्यांना कोरोनाची लागण झाल्याने खासगी रुग्णालयात दाखल केले. त्यांच्या पाठोपाठ त्यांचे आई, वडील आणि पत्नी स्वाती (35) यांनादेखील कोरोनाची लागण झाली. या सर्वांना उपचारासाठी वसईच्या खासगी रुग्णालयात दाखल केले होते.

दरम्यान, स्वाती या बऱया झाल्याने त्या रुग्णालयातून घरी आल्या होत्या. मंगळवारी सकाळी विवेक यांची प्रकृती खालावल्याची माहिती व नंतर त्यांचा मृत्यू झाल्याचे त्यांना समजले. त्याचा मोठा मानसिक धक्का पत्नी स्वाती यांना बसला. हा धक्का असह्य झाल्याने मंगळवारी दुपारी गळफास घेऊन त्यांनी आत्महत्या केली. मात्र त्यांच्या पतीचे निधन झालेले नसून अजून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मात्र चुकीची माहिती मिळाल्याने स्वाती डिसिल्वा यांना विनाकारण आपला जीव गमवावा लागला.

आपली प्रतिक्रिया द्या