
कोरोनाने मुंबईसह राज्यभरात पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. शनिवारी मुंबईत 105 नवीन रुग्णांची नोंद झाली. दुसरीकडे राज्यात दिवसभरात 437 नवीन रुग्णांची नोंद झाली असून दोन बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. झपाटय़ाने वाढणाऱ्या कोरोना रुग्णसंख्येमुळे आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे.
मुंबईत शनिवारी 105 नवीन रुग्णांची नोंद झाल्याने बाधित रुग्णांची संख्या 11 लाख 56 हजार 261 वर पोहोचली आहे. तर दिवसभरात 71 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने आतापर्यंत 11 लाख 36 हजार 27 बाधित रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. दिवसभरात शून्य मृत्यूची नोंद झाल्याने मृतांची संख्या 19 हजार 747 वर स्थिरावली आहे.
धक्कादायक! सर्व रुग्णांमध्ये कोरोनाचे वेगवेगळे व्हेरिएंट
कोरोनाच्या नवनवीन उपप्रकाराचा शिरकाव मुंबईत होत असून ओमायक्रॉन, एक्सबीबी बीक्यू, बीए, बीएन व्हेरिएंटचा धोका आजही कायम आहे. 1 जानेवारी ते 25 मार्च 2023 दरम्यान, पुण्याच्या एनआयव्ही प्रयोगशाळेत 141 रुग्णांचे नमुने तपासणीसाठी पाठवले होते. पुण्याच्या प्रयोगशाळेचा अहवाल प्राप्त झाला असून यामध्ये 100 टक्के रुग्ण कोरोनाचे वेगवेगळे व्हेरिएंट असल्याचे समोर आले आहे. यामध्ये एक्सबीबी, बीक्यू, बीए, बीएन व्हेरिएंटचे आढळले आहेत. त्यामुळे मुंबईत कोरोनाचा धोका कायम असून मुंबईकरांनी गर्दीच्या ठिकाणी शक्यतो मास्क वापरावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
141 नमुन्यांचा अहवाल
व्हेरिएंट नमुने (स्वॅब) अहवाल
एक्सबीबी 71 50 टक्के
बीक्यू 23 16 टक्के
सीएचएच 11 8 टक्के
बीए 14 10 टक्के
बीएन 8 6 टक्के
अन्य 14 10 टक्के