चीननंतर आता इराण आणि इटलीत कोरोनाचं थैमान

1332
प्रातिनिधिक फोटो

चीनमध्ये कोरोनासारख्या महाभयंकर संकटाने थैमान घातलं आहे. चीनमध्ये आतापर्यंत कोरोनाने मरण पावलेल्यांची संख्या दोन हजारांहून जास्त झाली आहे. अर्थात चीनने कोरोनावर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. त्या प्रयत्नांना यश येऊन रुग्णांची संख्याही घटत आहे. मात्र, दुसरीकडे इराण आणि इटली या देशांमध्ये कोरोना वेगाने फैलावत असल्याचं वृत्त आहे. या दोन देशांखेरीज दक्षिण कोरिया आणि लेबनॉनमध्येही कोरोना शिरला आहे.

नवभारत टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, दक्षिण कोरियात कोरोनाग्रस्तांची संख्या 433वर पोहोचली असून हा आकडा 1 हजार इतका होण्याची भीती व्यक्त केली जाते आहे. इराणमध्ये याच आठवड्याच्या सुरुवातीला एकही नागरिक कोरोनाग्रस्त नव्हता. पण शनिवारपर्यंत 29 जणांना याची लागण झाल्याचं वृत्त असून 6 जण दगावले आहेत.

चीनच्या बाहेर तब्बल 26 देशांमध्ये कोरोना पोहोचला आहे. इटलीतही 12 शहरं पूर्णपणे बंद करण्यात आली आहेत. मिलान येथील सर्व सरकारी कार्यालयं बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तर संशयित रुग्णांना वेगळं ठेवण्यात आलं आहे. इराण आणि लेबनॉनमध्येही कोरोनाचे संशयित रुग्ण आढळले आहेत. कोरोनाच्या या संकटामुळे जपान इथे होऊ घातलेल्या टोकियो ऑलिम्पिकवर प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे. दुसरीकडे, जागतिक आरोग्य संघटनेने चीनमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या घटल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. पण, दुसऱ्या देशांत वाढणाऱ्या संख्येबाबत चिंता व्यक्त केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या