#corona कोल्हारमध्ये विनाकारण फिरणाऱ्यांची लोणी पोलिसांकडून जोरदार धुलाई

कोल्हार भगवतीपूरमध्ये शुक्रवारी भाजीपाला व्यापारी व ग्रामस्थांनी लॉकडाऊन धाब्यावर बसविला. व सोशल डिस्टनसिंगचे तीनतेरा वाजवले होते. त्यावर लोणी पोलिसांनी कठोर भूमिका घेत रस्त्यावर विनाकारण रपेट मारणाऱ्याची धुलाई सुरू केली. त्यासोबत दोन्ही ग्रामपंचायतीने गावात पूर्णतः नाकाबंदी केली आहे.

देशभर थैमान घालणाऱ्या कोरोना संसर्ग रोखण्यासाठी शासनाने लॉकडाऊन केले आणि त्या सोबत घरीच राहण्याचे आवाहन करीत आहे. मात्र शुक्रवारी बाहेरील व्यापाऱ्यांनी विनापरवाना आठवडे बाजारात भाजीपाला आणला अन एकच गर्दी उसळली. सुरक्षित अंतराची ऐशी की तैशी करत कोरोनाला पोषक वातावरण तयार करण्यास व्यापारी व ग्रामस्थांनी कुठलीच कमतरता ठेवली नाही. त्यामुळे लोणी पोलिसांनी आता कायद्याचा धाक दाखवून बळाचा वापर सुरू केला आहे. विनाकारण रस्त्यावर फिरणारे वा टुकारगिरी करणाऱ्यांना पोलिसांनी चांगलाच चोप देण्यास प्रारंभ केला आहे.

लोणी पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या कोल्हार दूर क्षेत्रातील पोलीस दादांनी रस्त्यावर फिरणाऱ्या टूकारांना काठीचा प्रसाद दिला. त्यामुळे आतातरी नागरिक रस्त्यावर फिरणार नाहीत. कोरोना आता आपल्या दारापर्यंत येऊन ठेपला असताना येथील काही बेजबाबदार नागरिक या आजारास फैलावण्यास मदत करीत आहेत. तर बाजारात व्यापारी हा आजार वाढण्यासाठी पूरक वातावरण तयार करीत असल्याने लोणी पोलीस, कोल्हार व भगवतीपुर ग्रामपंचायत आणि श्री क्षेत्र कोल्हार भगवतीपुर देवालय ट्रस्टकडून योग्य त्या उपाययोजना व स्पीकर वरून प्रबोधन सुद्धा करण्यात येत आहे. मात्र लोणी पोलिसांनी आता कायद्याची कडक अंमलबजावणी करणे आवश्यक बनत असून लोणीचे सपोनि पाटील व पीएसआय सूर्यवंशी यांनी आता कठोर भूमिका घेत सर्व कर्मचाऱ्यांसह रस्त्यावर उतरले आहेत. त्यामुळे आता मोकाट फिरणाऱ्यांची गय केली जाणार नाही हे निश्चित!

आपली प्रतिक्रिया द्या