कोरोना आयसोलेशनसाठी 11 दिवस झाडावर थाटला संसार कुटुंबाला संसर्ग नको म्हणून राहिला दूर

एकाच खोलीचे घर आणि घरात पाच-सहा जण. त्यामुळे तेलंगणातील एका युवकाने कोरोना झाल्यावर आयसोलेशनमध्ये राहण्यासाठी 11 दिवस झाडावरच संसार थाटला. आपल्यापासून कुटुंबाला संसर्ग होऊ नये म्हणून शिवा नावाचा 18 वर्षांचा हा युवक घरच्यांपासून दूर राहिला.

देशभरात सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेन थैमान घातले आहे. रुग्णालयांमध्ये बेड, औषधे आणि ऑक्सिजनचा मोठा तुटवडा जाणवत आहे. अशात गंभीर लक्षणे नसलेल्या कोरोना रुग्णांना होम आयसोलेशनमध्ये राहाण्यास सांगितले जाते, मात्र एका खोलीचे घर असणाऱ्यांची फार मोठी अडचण होते. कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीपुढे हार न मानता तेलंगणाच्या नालगोंडा जिह्यातील रुग्णाने आयसोलेट होण्यासाठी झाडावर राहण्याचा एक वेगळाच पर्याय शोधून काढला.

शिक्षणासाठी हैदराबादमध्ये राहत असणारा शिवा नावाचा हा युवक लॉकडाऊनमुळे आपल्या घरी परतला. कोरोनाची हलकी लक्षणे दिसल्याने चाचणी केली असता रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. डॉक्टरांनी त्याला घरीच आयसोलेट हो आणि घरच्यांपासून दूर राहण्याचा सल्ला दिला, मात्र घरातील परिस्थिती आणि गावात आयसोलेशन सेंटर नसल्याने त्याने 11 दिवस झाडावरच घालवले.

गवताचा केला बिछाना

घरासमोरच असलेल्या एका झाडावर शिवा याने बांबू आणि गवताच्या सहाय्याने झाडावरच एक बिछाना तयार केला. एक दोरी आणि बादलीच्या सहाय्याने रोजचे जेवण आणि औषधे घेण्याची व्यवस्था केली. 11 दिवस घरासमोर असणारे झाडच त्याचे कोविड आयसोलेशन वॉर्ड झाले होते.

तेलंगणातील नालागोंडा जिह्यातील कोठानंदीकाडा या गावामध्ये जवळपास 350 कुटुंबे राहतात. आरोग्य केंद्रदेखील गावापासून पाच किलोमीटर दूर असल्याने रुग्णांना औषधे मिळण्यात अडचणी येतात. येथील बहुतांश कुटुंबे एका खोलीच्या घरात राहतात. त्यामुळे कोरोना रुग्णांना आयसोलेट कुठे करायचे हा त्यांच्यापुढे  मोठा प्रश्न आहे.

आपली प्रतिक्रिया द्या