कोरोनाचा धोका वाढतोय….जगभरात 24 तासात 66 हजार नवे रुग्ण

जगासह देशभरात कोरोनाचा संसर्ग पुन्हा एकदा हातपाय पसरू लागला आहे. देशातील अनेक राज्यांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा एकदा झपाट्याने वाढत आहे. दिल्ली, महाराष्ट्र आणि गुजरातसह देशाच्या इतर भागातही कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर योग्य ती काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. गेल्या 24 तासांत जगभरात कोरोनाचे 66 हजार नवे रुग्ण आढळले आहेत. तर राजधानी दिल्लीत कोरोनाचे 72 नवीन रुग्ण आढळले आहेत. यासह पॉझिटिव्हिटी रेट 3.95 टक्के झाला आहे. त्यामुळे जगभरात पुन्हा एकदा कोरोनाचा धोका वाढत असल्याचे दिसून येत आहे.

आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, एकीकडे H3N2 व्हायरससोबतच दिल्लीत कोरोनाच्या रुग्णांमध्येही वाढ झाली आहे. दिल्लीतील कोरोना पॉझिटिव्ह दर शनिवारी 3.52 टक्के होता. महाराष्ट्रात कोरोनाच्या प्रकरणांमुळे तणाव वाढत आहे. रविवारी राज्यात कोरोनाचे 236 नवे रुग्ण आढळून आले आहेत. या 236 पैकी 52 प्रकरणे मुंबईत आली आहेत. याशिवाय ठाण्यात 33, पुण्यात 69, नाशिकमध्ये 21 आणि कोल्हापूर आणि अकोल्यात प्रत्येकी 13 रुग्ण आढळले आहेत. महाराष्ट्र आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, रविवारी राज्यात कोरोना व्हायरसचे 236 नवीन रुग्णांची नोंद झाली, त्यानंतर राज्यातील संसर्गाच्या रुग्णांची संख्या 81,39,737 झाली आहे. यादरम्यान एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही.

गेल्या 24 तासांत देशभरात कोविडचे 918 नवीन रुग्ण आढळले आहेत. यासह, सोमवारी सक्रिय रुग्णांची संख्या 6350 वर गेली आहे. त्याच वेळी, पॉझिटिव्हिटी रेट 2.08% वर गेला आहे. देशात सुमारे चार महिन्यांनंतर कोरोनाची प्रकरणे वाढू लागली आहेत. त्यामुळे चिंता व्यक्त होत आहे. देशासह चीन, सिंगापूर, युनायटेड स्टेट्समध्ये कोरोना वेगाने पसरत आहे.