कोरोनाग्रस्त असतानाही घातले 50 सूर्यनमस्कार, माझ्यासह शहर कोरोनामुक्त होईल मालेगाव महापालिका आयुक्तांचा विश्वास

3057

>> बाबासाहेब गायकवाड, नाशिक

मी कोरोनाग्रस्त असल्याने 13 मे पासून होम क्वॉरंटाईन आहे. मला कुठलीही लक्षणे नाहीत आणि त्रासही होत नाही. 13 मे रोजी देखील नेहमीप्रमाणे मी योगा, प्राणायाम केले, तब्बल 50 सूर्यनमस्कार घातले, बैठका मारल्या. श्वास घेण्यास त्रास झाला नाही की दमही लागला नाही. यामुळे मी लवकरच कोरोनामुक्त होईल आणि मालेगावकरांनाही कोरोनामुक्त करील. कोरोनाविरूद्धच्या लढाईतील या युद्धभूमीवरून पळ काढणार नाही, असा आत्मविश्वास मालेगाव महापालिकेचे आयुक्त दीपक कासार यांनी ‘सामना’शी बोलताना व्यक्त केला.

कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या मालेगाव महापालिकेच्या आयुक्तपदाचा कार्यभार दीपक कासार यांनी 29 एप्रिलला हाती घेतला आणि धडाकेबाज कामकाज सुरू केले. गोदामावर धाड टाकून मास्क, सॅनिटायझरसह औषधांचा दडवून ठेवलेला साठा बाहेर काढला. कोव्हिड सेंटर व क्वॉरंटाईन रुग्णालयाबाहेर नेमणूक असतानाही गैरहजर असलेल्या 33 सुरक्षारक्षकांविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन व साथरोग नियंत्रण कायद्यान्वये गुन्हा दाखल करून प्रशासनावर पकड मिळविली. संपूर्ण शहरात 20 ट्रॅक्टरद्वारे फॉगिंग व जंतूनाशकाची फवारणी करून घेतली. फिवर क्लिनिकसाठी डॉक्टरांचे नियोजन केले. ऍम्ब्युलन्स सुरू केल्या. औषध व वैद्यकीय साहित्य वितरण याचे नियोजन केले. महापालिका अधिकारी, कर्मचार्‍यांमध्ये समन्वय घडवून आणला आणि कामाला वेग दिला.

पीपीई किट घालून कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांशी संवाद साधला, व्यवस्थेची पाहणी केली. जीवन व फरहान रूग्णालयाला स्वत: भेटी दिल्या. तपासणीसाठी संशयित रूग्णांनी पुढे यावे यासाठी दाट वस्त्यांमध्ये जावून प्रबोधन केले. यामुळे थेट संपर्क आल्याने माझा वैद्यकीय अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला असावा. जीवन व फरहान रूग्णालयाच्या नूतनीकरणाचे काम वेगाने पूर्ण करून या रूग्णालयात रूग्णसेवा लवकरात लवकर सुरू करील, असेही कासार यांनी सांगितले.

मला कुठला त्रास होत नसला तरी मी सर्व नियमांचे काटेकोर पालन करीत आहे. आजही अधिकार्‍यांशी मोबाईलवरून संपर्क साधून कामकाजाचा आढावा घेतला, सूचना दिल्या व नियोजन केले. उपचार केंद्रावर जास्तीत जास्त सुविधा द्या, दक्षता घ्या, असे निर्देश दिले, असेही त्यांनी सांगितले. मी कोरोनामुक्त होईलच; परंतु सरकारने मालेगावला दिलेले पाठबळ, पुरविलेल्या सुविधा आणि मालेगाव महापालिकेतील अधिकारी, कर्मचार्‍यांचे टिमवर्क यामुळे संपूर्ण शहर कोरोनामुक्त होईल, असेही ते म्हणाले.

कोरोनाग्रस्त आयुक्तांचा अहवाल पाचव्या दिवशी निगेटिव्ह

नियमित औषधोपचाराला आत्मविश्वासाची जोड मिळाल्याने कोरोना पॉझिटिव्ह आलेले मालेगाव महापालिकेचे आयुक्त दीपक कासार यांचा पुढचा तपासणी अहवाल अवघ्या पाचव्याच दिवशी निगेटिव्ह आला आहे. त्यांचा दुसरा अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर ते पूर्णपणे बरे झाल्याचे स्पष्ट होईल. मालेगावकरांनी घाबरून न जाता वेळेत औषधोपचार घेत सर्व नियमांचे पालन केले तर लवकरच आपले शहर कोरोनामुक्त होईल, असा विश्वास त्यांनी पुन्हा एकदा व्यक्त केला.

आपली प्रतिक्रिया द्या