कोरोनाच्या नव्या स्ट्रेनपासून वाचण्यासाठी काय खावं, काय नाही? WHO ने सांगितलं कसा असावा आहार

कोरोनाच्या नव्या स्ट्रेनने जगभरात धुमाकूळ घातला आहे. हिंदूस्थानमध्येही याचा प्रकोप सुरू असून गेल्या दोन-तीन दिवसांपासून रोजच दोन लाखांहून अधिक रुग्ण आढळत आहेत. तसेच अनेक शहरांमधील परिस्थिती बिकट होत चालली आहे. कोरोनाचा नवा स्ट्रेन प्रौढांसह लहान मुलं आणि तरुणांनाही आपल्या विळख्यात घेत आहे.

नव्या स्ट्रेनचे संक्रमण अधिक वेगाने होत असून तुमची छोटीशी चूकही याला आमंत्रण देणारी ठरू शकते. सतत हात धूत राहणे, मास्कचा वापर करणे आणि सोशल डिस्टन्स पाळणे यासह आहारावरही लक्ष देणे आवश्यक आहे. असंतुलित आहार आजारपण आणि संक्रमणाचा धोका वाढवतो. त्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनापासून वाचण्यासाठी आहार कसा असावा याबाबत माहिती दिली आहे.

काय खावं?

– आहारामध्ये ताजी फळं, प्रक्रिया न केलेले खाद्य यांचा समावेश असावा. यामुळे शरीराला आवश्यक जीवनसत्वे, मिनरल्स, फायबर, प्रोटिन आणि अँटिऑक्सिडेंट मिळत राहील.
– आहारामध्ये फळं, हिरव्या भाज्या, दाळ, मोड आलेले कडधान्य, कोशिंबीरी, बाजरी, गहू, ज्वारी यांचा समावेश करावा.
– मांसाहार करत असाल तर चिकन, मटण, मांसे, अंडे यांचाही आहारास समतोल प्रमाणात समावेशक करावा. प्रक्रिया केलेल्या मांसापासून दूर राहणेच योग्य.
– दिवसातून कमीतकमी दोन फळं, दोन-अडीच कप भाजी, 200 ग्राम धान्य (गहू, ज्वारी, बाजरी) आणि दीडशे ग्राम मांस यांचा समावेश करावा. तसेच आठवड्यातून एक-दोन वेळा रेड मीट आणि चिकन खाऊ शकता.
– सायंकाळच्या वेळी भूक लागल्यास कच्ची भाजी किंवा ताजी फळं खावीत.
– रात्रीचा आहार कमी असावा (भूकेपेक्षा एक घास कमीच खावा) आणि झोपताना हळद टाकून दूध घेतल्यास उत्तम.

पाण्याचा करा वापर

शरीरासाठी पाणी आवश्यक घटक आहे. रक्तापर्यंत पोषणमुल्य पोहोचवण्याचे, शरीराचे तापमान नियंत्रीत ठेवण्याचे आणि विषारी पदार्थ शरीराबाहेर काढण्याचे काम पाणी करते. त्यामुळे दिवसातून कमीत-कमी 8 ते 10 ग्लास पाणी प्या (ऋतूमानानुसार हे प्रमाण कमी-जास्त होऊ शकते). पाण्यासह ताज्या फळांचा ज्यूस आणि लिंबू पाणीही प्या. मात्र सॉफ्ट ड्रिंक, कोल्ड ड्रिंक, सोडा यापासून दूर रहा.

काय खाऊ नये?

– कोरोना एकमेकांच्या संपर्कात आल्याने पसरतो. त्यामुळे बाहेर खाण्यास जाण्याऐवजी घरीच ताजे जेवण घ्या.
– प्रक्रिया केलेले खाद्य खाण्यापासून चार हात लांबच रहा.
– गोड, फॅट असणारे आणि जास्त मिठ असणारे पदार्थ खाऊ नका. यामुळे वजन वाढू शकते, ह्रदयाचे आजार होऊ शकतात, तसेच मधुमेहाचाही त्रास होऊ शकतो.
– प्रोसेस्ड फूड, फास्ट फूड, स्नॅक्स फूड, फ्राईड फूड, फ्रोजेन पिज्जा, कुकीज, क्रीम यामध्ये फॅट्सचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे यापासून जितके लांब रहात तितके चांगले.
– शिळे अन्न किंवा फ्रिजमध्ये ठेवलेले (दोन-तीन दिवसांपूर्वीचे) अन्न खाऊ नका.
– दारू, सिगारेट यांचे सेवन टाळा.

आपली प्रतिक्रिया द्या