कोरोना संकटातही पाकिस्तानचा पाताळयंत्रीपणा, हिंदूच्या घरांवरून फिरवले बुलडोझर

कोरोना विषाणूच्या संसर्गाने जगभरात थैमान घातलं आहे. अनेक देश परस्परांतील वाद बाजूला ठेवून एकमेकांची मदत करत आहेत. मात्र, या दरम्यानही पाकिस्तानचा पाताळयंत्रीपणा सुरूच असल्याचं दिसत आहे. पाकिस्तानात एकिकडे संसर्गापासून वाचण्यासाठी लोकांना घरी राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. तर दुसरीकडे हिंदूच्या घरांवरून बुलडोझर फिरवल्याचं वृत्त आहे.

झी न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, पाकिस्तानातील पंजाब प्रांतातल्या बहावलपूर येथे ही घटना घडली आहे. येथील अल्पसंख्याक हिंदू कुटुंबांच्या घरांवरून बुलडोझर फिरवण्यात आला आहे. पाकिस्तानचे मंत्री तारिक बशीर चीमा यांच्या आदेशावरून त्यांची घरं पाडण्यात आल्याचीही माहिती मिळत आहे. त्यांची घरं चीमा यांच्या देखरेखीखालीच पाडण्यात आली. पाकिस्तानचे माहिती आणि प्रसारण विभागाचे अधिकारीही यात सहभागी होते. हिंदू कुटुंबांनी घरं न पाडण्याची विनंती करूनही त्यांच्या घरांवर बुलडोझर फिरवून ती जमीनदोस्त करण्यात आली. त्यामुळे अनेक हिंदू कुुटुंबांवर अशा कोरोनाच्या संकटकाळात बेघर होण्याची वेळ आली आहे.

अशा प्रकारची पाकिस्तानमधील ही पहिली घटना नसून यापूर्वीही पंजाब प्रांतातील खानवेल येथे तहरीक ए इन्साफ या पाकिस्तानातील राजकीय पक्षाच्या नेत्याने ख्रिश्चन धर्मीयांची घरं आणि दफनभूमी उद्ध्वस्त केली आहेत. पाकिस्तानने अल्पसंख्याकांच्या संरक्षणाबाबत कितीही दावे केले असले तरी, त्यांच्यावर होणारे अत्याचार थांबलेले नसल्याचं चित्र वारंवार दिसत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या