दोन पैसे जास्त खर्च होऊ द्या, पण सुरक्षित प्रवास हवा! कोरोनामुळे प्रवाशांचे सुरक्षेला प्राधान्य

देशात अनलॉकची प्रक्रिया सुरू असतानाच सणासुदीचे दिवस सुरू झाले आहेत. त्यामुळे खरेदीबरोबरच देशांतर्गत प्रवासासाठी नागरिक घराबाहेर पडू लागले आहेत.

मात्र डोक्यावर कोरोनाचे संकट असल्याने प्रवासासाठी दोन पैसे जादा खर्च करायला नागरिक तयार आहेत, पण त्यांना सुरक्षित प्रवास हवा अशी त्यांची भावना असल्याचे लॉयल्टी प्रोग्राम पेबॅक आणि उनामेरने केलेल्या अभ्यासातून स्पष्ट झाले आहे.

नागरीक याआधी प्रवासाचे नियोजन करताना प्रवास खर्चात कशी बचत करायची याबाबत विचार करायचे. पण कोरोनामुळे त्यांच्या बचतीच्या विचारात बदल झाला आहे.

सध्या नागरिक प्रवासासाठी जादा पैसे खर्च करायला तयार आहेत, पण प्रवासा दरम्यान सुरक्षेशी तडजोड करण्यास तयार नाहीत. त्यामुळेच लोक सध्या देशांतर्गत प्रवासासाठी विमान प्रवासाला किंवा स्वतंत्र वाहनाने प्रवास करण्यास पसंती देत आहेत. दरम्यान लॉयल्टी प्रोग्राम पेबॅक आणि उनामेरने 25-50 वयोगटातील नागरिकांची मते जाणून घेतली आहेत.

महिलांची सेल्फ ड्राइव्हला पसंती

सध्या कोरोनामुळे अनेकजण प्रवास टाळत असले तरी महत्वाच्या कामासाठी बाहेर पडावेच लागते. त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव ड्रायव्हरवर विसंबून न राहता महिलांकडून सेल्फ ड्राईव्हला पसंती दिली जात आहे. तसेच दरवर्षीच्या तुलनेत यंदा 25 टक्क्यांपेक्षा कमी लोक प्रवासावर खर्च करू इच्छित आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या