Corona – मृत्यूनंतरही फरफट, अंत्यसंस्कारावेळी जमावाचा हल्ला; अर्धवट जळालेला मृतदेह घेऊन कुटुंबाचा पळ

3361

कोरोना विषाणूमुळे मृत्यू झालेल्या रुग्णांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. अनेक ठिकाणी कुटुंबीयांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिल्याने प्रशासनाला हे काम करावे लागत आहे, तर काही ठिकाणी कुटुंबियांना आजूबाजूच्या लोकांकडून मनस्ताप सहन करावा लागत आहे. असाच एक प्रकार जम्मूमध्ये घडला असून येथे व्यक्तीचा कोरोना विषाणूच्या संक्रमणामुळे मृत्यू झाला. त्याच्यावर अंत्यसंस्कार सुरू असताना जमावाने अचानक हल्ला चढवला, यामुळे नातेवाईकांना मृतदेह अर्थवत जळालेल्या अवस्थेत सोडून पळावे लागले.

मृतकाच्या मुलाने ‘पीटीआय’ला दिलेल्या माहितीनुसार, आम्ही डोडा जिल्ह्यातील रविवासी असून 72 वर्षीय वडिलांना कोरोनाची लागण झाली होती. सोमवारी जम्मू येथील रुग्णालयात कोरोना विषाणूवर उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. मृत्यूनंतर आम्ही वडिलांवर एका सरकारी अधिकाऱ्याच्या आणि वैद्यकीय पथकासोबत अंत्यसंस्कार विधी सुरू होते.

डोमना येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अग्नीदाह संस्कार करण्यात आले. यावेळी मृतकाची पत्नी, दोन्ही मुले आणि काही जवळचे नातेवाईक उपस्थित होते. या दरम्यान मोठ्या संख्येने स्थानिक लोक जमा झाले आणि अंत्यसंस्कारात विघ्न आणले. जमावाने हल्ला करत दगडफेक केली आणि लाठ्या-काठ्याने हल्ला चढवला. त्यामुळे नातेवाईकांनी अर्धवट जळालेला मृतदेह रुग्णवाहिकेत ठेवला आणि तेथून पळ काढला. यानंतर त्यांच्यावर अन्य ठिकाणी अंत्यसंस्कार करण्यात आले.

आम्ही सरकारकडे वडिलांवर मूळ गावी अंत्यसंस्कार करण्याची परवानगी मागितली होती, मात्र त्यांनी नकार देत जिथे मृत्यू झाला, तिथेच अंत्यसंस्कार करण्यास सांगितले. तिथे कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही असे आश्वासन प्रशासनाने दिले. मात्र अंत्यसंस्कार सुरू असताना जमावाने हल्ला केला. यावेळी उपस्थित सुरक्षा रक्षकांनी बघ्याची भूमिका घेतली, असा आरोप मृतकाच्या मुलाने केला. रुग्णवाहिकेचा चालक आणि रुग्णालय कर्मचारी यांनी आम्हाला सहकार्य केले, मात्र कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी चांगली व्यवस्था करणे आवश्यक असल्याचे मृतकाच्या मुलाने म्हटले.

आपली प्रतिक्रिया द्या