मुंबईत पहिल्यांदाच रुग्ण दुपटीचा कालावधी शतकी पार; एका दिवसात कालावधी 5 टक्क्यांनी वाढला

कोरोनाला रोखण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने राबवलेल्या ‘चेस द व्हायरस’ तसेच राज्य सरकारने राबवलेल्या ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या मोहिमांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून मुंबईत पहिल्यांदाच रुग्ण दुपटीचा सरासरी कालावधी शतकी पार गेला आहे. मंगळवारपर्यंत रुग्ण दुपटीचा कालावधी 95 टक्के होता. मात्र, एकाच दिवसांत हा कालावधी तब्बल 5 टक्क्यांनी वाढून त्याने 102 दिवसांचा टप्पा गाठला आहे. त्याचबरोबर गेल्या आठवडाभरात मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्याही मोठ्या प्रमाणात घटली आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, मुंबई महानगरपालिकेने ‘चेस द व्हायरस’ तर राज्य सरकारची ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ ही राज्यव्यापी मोहीम राबवण्यात येत आहे. ‘चेस द व्हायरस’मधून ट्रेसिंग, ट्रॅकिंग, टेस्टिंग, आणि ट्रिटिंग या चतुःसूत्रीनुसार अविरतपणे मोहीम राबवण्यात येत आहे. त्यामुळे कोरोनाला रोखण्यासाठी आणि नियंत्रणात आणण्यासाठी मोठी मदत होत आहे. ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या मोहिमेंतर्गत अव्याहतपणे घराघरात पडताळणी, मुंबई पोलिसांच्या सहकार्याने राबवण्यात येत असलेल्या प्रतिबंधक उपायोजनांमुळे तसेच महापालिकेद्वारे घेण्यात येत असलेल्या अविश्रांत प्रयत्नांना मुंबईकरांची मोलाची साथ मिळत असल्याने त्याचे सकारात्मक परिणाम आता दिसू लागले आहेत.

वरळी, प्रभादेवी, लोअर परळमध्ये सर्वात कमी दरवाढ
दैनंदिन वाढीची सरासरी टक्केवारी दिवसेंदिवस कमी होत असून, गेल्या महिन्यात 21 सप्टेंबरला 1.22 टक्के असणारी आकडेवारी आता एका महिन्यानंतर 0.69 टक्क्यांवर आली आहे तर विभागस्तरीय आकडेवारीत हा दर आणखी कमी झाला आहे. ‘जी/दक्षिण’ विभागामध्ये येणाऱ्या वरळी, प्रभादेवी आणि लोअर परळमध्ये सर्वात कमी म्हणजे 0.40 टक्के इतकी दरवाढ झाली आहे. त्या खालोखाल ‘ई’ विभागात 0.43 टक्के आणि ‘एफ/दक्षिण’ विभागात 0.44 टक्के एवढा कमी दर नोंदवण्यात आला. सर्व 24 विभागांपैकी 13 विभागांमधील सरासरी दैनंदिन रुग्णवाढीचा एकूण सरासरीपेक्षा अर्थात 0.69 टक्क्यांपेक्षा कमी आहे. एकीकडे रुग्ण दुपटीच्या कालावधीत सकारात्मक वाढ नोंदविली जात असतानाच, रुग्ण वाढीच्या दैनंदिन सरासरी टक्केवारीतही दररोज सकारात्मक घट नोंदवली जात आहे. यामुळे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.

मुंबईत ‘मिशन झीरो’ हेच ध्येय – आयुक्त
मुंबई महापालिकेने रुग्ण दुप्पट होण्याच्या कालावधीने पहिल्यांदाच तब्बल 102 दिवसांचा टप्पा गाठत ‘शतक’ पार केले आहे. लोकप्रतिनिधींच्या मार्गदर्शनामुळे आणि मुंबईकरांच्या सहकार्यामुळेच कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजनांना बळ मिळत आहे. त्याचबरोबर प्रशासनाच्या अव्याहत प्रयत्नांना मोलाची साथ देणाऱ्या मुंबईकरांची पालिका आभारी आहे. आगामी काळात मुंबईत ‘मिशन झीरो’ हे आपले ध्येय असून ते गाठण्यासाठी सर्वांनीच अधिक प्रभावीपणे अथक प्रयत्न करावेत, असे आवाहन पालिका आयुक्त इकबालसिंह चहल यांनी केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या