दहशत कोरोनाची; बारामती तालुक्यातील सहा जण होम क्वारंटाइन

9597

बारामती तालुक्यातील खंडुखैरेवाडी, देउळगांव रसाळ आणि मोरगाव आदी ठिकाणचे सहा जण परदेशातुन आल्याने परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. बारामतीच्या पश्चिम पट्टयातील सुपे परिसरातील ग्रामिण भागात कोरोनाचा फैलाव झाला तर आटोक्यात येणे मुश्किल होवु शकते. त्यामुळे या विषाणूचे गांभीर्य लक्षात घेवुन नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे आहे. मात्र नागरिकांना याबाबत गांभीर्य नसल्याचे दिसुन येत आहे. त्यामुळे सुपे परिसरात पोलिसांनी लाठी चार्ज केल्याने अनेक बड्या हस्तींना मार खावा लागला.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता काल राज्य सरकारने नागरी भागात जमावबंदी आदेश लागू करूनही लोक रस्त्यावर घोळक्याने जमा होत आहेत. वाहनांवरून जाणाऱ्यांची संख्या देखील लक्षणीय आहे. इतर देशांतील परिस्थिती लक्षात घेता नागरिकांनी वेळीच गांभीर्याने दक्षता घेण्याची आवश्यकता आहे. मात्र ग्रामीण भागात असे दिसुन येत नाही. ग्रामस्थ चौका चौकात बसल्याचे दिसुन येत आहेत.

त्यामुळे सुप्यात काल काही जण चौका चौकातुन बसल्याचे निदर्शनात येत होते. ही बाब पोलिसांच्या लक्षात येताच सहाय्यक पोलिस निरिक्षक सोमनाथ लांडे यांच्या मार्गदर्शनाखालील पोलिस पथकाने दुचाकीवरुन फिरणारे रिकामटेकडे, विहिरीत एकत्रित पोहणारे युवक तसेच चौकात बसणाऱ्या व्यक्तिंना चांगलाच चोप दिला. त्यामध्ये अनेक बड्या हस्तींना लाठीचा मार खावा लागल्याने पोलिसांची ही दहशत ग्रामस्थांच्या चांगलीच जिव्हारी लागल्याचे दिसुन येत आहे.

दरम्यान मोरगाव वैद्यकिय अधिकारी डॉ. अनिल वाघमारे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले कि, देउळगांव रसाळ येथे साउथ आफ्रिका येथुन तिघेजण आलेले आहे. त्यात एक पुरुष, महिला आणि लहान मुलाचा समावेश आहे. खंडुखैरेवाडी येथे ऑस्ट्रेलियातुन एक महिला तर मोरगाव येथे रशियामधुन दोन विद्यार्थी आले आहेत. या सर्वांची वैद्यकीय तपासणी केली आहे. या सहा जणांना होम क्वारंटाइन मध्ये राहण्याच्या सुचना केल्या आहेत. तसेच परदेशातुन आलेल्या सहा ही जणांच्या हातांवर होम क्वारंटाइनचे शिक्के मारलेले आहेत. तसेच त्यांना सक्तीने पंधरा दिवस घरात बसण्याच्या सुचना दिल्याचे त्यांनी सांगितले.

सुप्यासह मोरगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातंर्गत पुणे अथवा मुंबई येथुन येणाऱ्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहेत. तसेच त्यांची माहिती या केंद्राचे आरोग्य सेवक घेत असल्याचे डॉ. वाघमारे यांनी दिली.

आपली प्रतिक्रिया द्या