कोरोनाबाधित महिलेचे मायमर रुग्णालयातून पलायन; दीड तासानंतर घेतले ताब्यात

767

कोरोनाबाधित महिलेने रुग्णालयातून पलायन केल्याची घटना मायमर रुग्णालयात घडली आहे. कर्मचाऱ्यांची नजर चुकवून 45 वर्षांच्या कोरोनाबाधित महिलेने रुग्णालयाच्या सुरक्षा भिंतीवरुन उडी मारुन पलायन केले. ही घटना बुधवारी (दि.8) सायंकाळी सहाच्या सुमारास घडली होती. सुमारे दीड तासांच्या शोध मोहिमेनंतर त्या महिलेला ताब्यात घेण्यात यश आल्याने सर्वांचा जीव भांड्यात पडला.

या मगिलेला 3 जुलैला मायमर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. या महिलेने बुधवारी सायंकाळी कर्मचाऱ्यांची नजर चुकवून सुरक्षा भिंतीवरुन उडी मारुन पळ काढला होता. ही घटना कर्मचाऱ्यांच्या लक्षात येताच पोलीस व नागरिकांच्या मदतीने सुमारे दीड तासानंतर तिचा शोध लागला. बांधकाम सुरू असलेल्या एका इमारतीत ती महिला लपून बसली होती. हातात लोखंडी गज आणि विट घेतली होती. ती महिला दगड फेकून मारत असल्याने तिला पकडण्यासाठी जवळ जाणेही कठीण झाले होते. त्या रुग्ण महिलेला बोलण्यात गुंतवून पीपीई किट घातलेल्या चार कर्मचाऱ्यांनी पाठीमागील बाजूने इमारतीत प्रवेश करून तिला पकडले आणि रुग्णवाहिकेत घालून अखेर कसेबसे पुन्हा रूग्णालयात दाखल केले. ही महिला कामशेतची रहिवासी असल्याचे प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले. आजारामुळे महिलेचे मानसिक संतुलन बिघडल्याचे सांगण्यात येते.

आपली प्रतिक्रिया द्या