कोरोनाग्रस्तासोबत सेल्फी काढून सोशल मीडियावर टाकला, सहा अधिकारी निलंबित

995

कोरोना व्हायरसमुळे सध्या जगभरात भयंकर दहशत निर्माण झाली आहेत. हजारो लोकांचे मृत्यू झाले असून तितक्या संख्येने कोरोनाबाधित लोक मृत्युशी झुंज देत आहेत. अशा गंभीर वातावरणात एका कोरोनाग्रस्त रुग्णासोबतचा सेल्फी काढून सोशल मीडियावर शेअर करणं पाकिस्तानमधील सहा अधिकाऱ्यांना महागात पडलं आहे.

पाकिस्तानी वृत्तसंस्था डॉनने दिलेल्या वृत्तानुसार, हे सहा अधिकारी पाकिस्तानच्या महसूल विभागात काम करतात. पाकिस्तानमधील खैरपूर येथील उच्चाधिकाऱ्यांनी या सहा जणांचं निलंबन केलं आहे. ज्या कोरोनाग्रस्तासोबत त्यांनी सेल्फी काढला तो काही काळापूर्वी इराणमधील एका धार्मिक यात्रेहून परतला होता. महिन्याभरापूर्वी या सहा अधिकाऱ्यांनी त्याची भेट घेतली होती. त्यावेळी त्यांनी एकत्र सेल्फीही काढला होता.

ही भेट झाली तेव्हा संबंधित व्यक्तिला कोरोनाची कोणतीही लक्षणे दिसत नव्हती किंवा तो आजारीही नव्हता. पण, काही दिवसांनी तो आजारी पडला आणि चाचणीअंती कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं निष्पन्न झालं. त्यानंतर या सहा जणांपैकी काहींनी त्याच्या भेटीवेळी काढलेला सेल्फी व्हायरल केला. ही बाब महसूल विभागाच्या उच्चाधिकाऱ्यांपर्यंत पोहोचल्यानंतर या सहाही जणांचं निलंबन करण्यात आलं आणि आता त्यांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आलं आहे.

आपली प्रतिक्रिया द्या