कोरोनामुळे पुणे पोलिसांसाठी आता ‘वॉटर बेल’चा उपक्रम

484

कोरोनामुळे शहरातील विविध रस्त्यावर नाकाबंदीसाठी तैनात असलेल्या पोलिसांसाठी वॉटर बेलचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. पुणे पोलिसांच्या परिमंडळ तीन अंतर्गत 17 नाकाबंदी नाक्यासह दत्तवाडी पोलीस ठाण्याअंतर्गत उपक्रम राबविला जात आहे. त्यानुसार, प्रत्येक तासाला घंटानाद झाल्यानंतर नाकाबंदी करणाऱ्या सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी हात स्वच्छ धुणे, भरपूर पाणी पिऊन विश्रांती घेत आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदीमुळे शहराच्या वेगवेगळ्या भागात पुणे पोलिसांनी नाकाबंदी केलेली आहे. या नाकाबंदी केंद्रावर मोठ्या प्रमाणात पोलिस अधिकारी व कर्मचारी कार्यरत आहेत. नाकाबंदी सुरू असताना दिवसभरात हजारो लोकांचा पोलिसांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे पोलिसांनी निरोगी आणि कार्यतत्पर असणे महत्वाचे आहे. दरम्यान, ही बाब लक्षात परिमंडळ तीनच्या पोलिस उपायुक्त पौर्णिमा गायकवाड यांनी पोलिस अधिकारी व कर्मचारी यांना नाकाबंदी बंदोबस्त करताना स्वतःच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी “वॉटर बेल” हा उपक्रम सुरू केला. त्याद्वारे नाकाबंदी ठिकाणावर असलेल्या पोलिस अधिकारी व कर्मचारी यांना सूचना देण्यासाठी दर एक तासाने घंटानाद करतो. त्यानंतर तेथे बंदोबस्तावर असलेल्या पोलिस अधिकारी व कर्मचारी यांनी तत्काळ आपले हात सैनितायझर वापरून हात स्वच्छ करून घेतात. त्यानंतर तेथे उपलब्ध करून दिलेल्या पोर्टेबल बेसीन मध्ये पुन्हा साबणाने हात धुवून पाणी पिण्यास प्राधान्य दिले जात आहे. हा उपक्रम परिमंडळ तीनच्या हद्दीत येणाऱ्या 17 नाकाबंदी केंद्रावर “वॉटर बेल” सुरू करण्यात आली आहे. त्यास चांगला प्रतिसाद मिळू लागला आहे. दत्तवाडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक देविदास घेवारे यांनीही त्यांच्या पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या नाकाबंदी ठिकाणावर ही सुविधा सुरू केली आहे.

दत्तवाडी पोलिस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या अशा नाकाबंदी केंद्रावर देखील ही व्यवस्था करण्यात आली आहे. दरम्यान शहरातील बहुतांश ठिकाणी पोलिसांना कामामुळे जेवण, पाणी व विश्रांती करण्यास वेळ मिळत नसल्याची सद्यस्थिती आहे. त्यामुळे पोलिसांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

आपली प्रतिक्रिया द्या