पुन्हा टेन्शन… कोविड आला! महाराष्ट्रात एका दिवसात 236 रुग्ण

कोरोनाने पुन्हा डोके वर काढल्यामुळे दिवसेंदिवस रुग्णसंख्येत वाढ होत आहे. एका दिवसात देशभरात 1071 नवीन रुग्णांची भर पडली. त्यात महाराष्ट्रातील 236 रुग्ण असून, नागरिकांमध्ये पुन्हा टेन्शन वाढले आहे. दरम्यान, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. डॉक्टरांनी रुग्णांना औषध देताना अॅझी, डॉक्सीसारख्या अॅण्टीबायोटिकचा वापर सर्रासपणे करू नये, असे स्पष्टपणे म्हटले आहे.

गेले काही महिने कोरोना रुग्णसंख्या घटली होती. मात्र, फेब्रुवारीपासून कोरोना रुग्णांमध्ये भर पडत आहे. त्याचबरोबर एच3एन2 (एन्फ्लूएंझा) आणि एच1एन1चेही (स्वाइन फ्लू) रुग्ण वाढत आहेत. विशेषतः तीन वर्षांनंतरही कोविड पूर्णपणे संपलेला नाही. यामुळे टेन्शन वाढले आहे.

देशात 6350 ऍक्टिव्ह रुग्ण

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार देशात 24 तासांत सोमवारी सकाळी 8 पर्यंत 1071 नवीन रुग्णांची भर पडली असून, चारजणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये दोघे राजस्थान आणि केरळ व कर्नाटकातील प्रत्येकी एक रुग्ण आहे. देशात सध्या 6350 ऑक्टिव्ह रुग्ण आहेत.

मार्गदर्शक सूचना

 • नागरिकांनी मास्क वापरावा, शरीराचे तापमान, ऑक्सिजन लेवलची तपासणी करावी.
 • श्वास घेण्यास त्रास, ताप, खोकला पाच दिवसांपेक्षा जास्त राहिल्यास तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्या.
 • रुग्णाला कोरोनाबरोबरच इतर इन्फेक्शन आहे का याची तपासणी डॉक्टरांनी करावी.
 • डॉक्टरांनी रुग्णांना सरसकट अॅण्टीबायोटिक देऊ नये. प्रामुख्याने ऑझिथ्रोमायसिन, डॉक्सीससायक्लिन, फेविपिराविर, मोल्नुपिराविर, इवरमेक्टिन, हायड्रोक्सीक्लोरोक्वीन, लोपिनाविर-रिटोनाविर ही औषधे देऊ नयेत.
 • ज्या रुग्णाची स्थिती गंभीर आहे त्याला पाच दिवसांसाठी रेमडेसिविर औषध डॉक्टरांच्या सल्ल्याने देता येईल.

महाराष्ट्रासाठी धोका

महाराष्ट्रातही कोरोनाचा धोका वाढत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. राज्यात गेल्या 24 तासांत 3834 कोरोना चाचण्या करण्यात आल्या. त्यात 236 पॉझिटिव्ह आढळले. सध्या राज्यात 1308 ऑक्टिव्ह रुग्ण आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 18.16 टक्के, तर मृत्यूदर 1.82 टक्के आहे.

प्रमुख शहरातील रुग्णसंख्या

 • मुंबई          52
 • मुंबई उपनगरे             109
 • ठाणे                33
 • पुणे           69
 • नाशिक            21
 • कोल्हापूर         13
 • अकोला           13
 • छत्रपती संभाजीनगर  10
 • नागपूर            2