नगर शहरात कोरोना चाचण्यांची संख्या वाढली; रोज 140 तपासण्या करण्याचे आरोग्य केंद्रांना टार्गेट

कोरोना व ‘एच3एन2’ या नव्या विषाणूमुळे एका तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर महापालिका प्रशासनाने शहरातील आरोग्य केंद्रांवर तपासण्यांची संख्या वाढवली आहे. शासनाच्या निर्देशानुसार दररोज 140 तपासण्या करण्याचे टार्गेट आरोग्य केंद्रांना देण्यात आले आहे. मात्र, नव्याने ‘एच3एन2’चा एकही रुग्ण शहरात आढळला नसल्याची माहिती मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे यांनी दिली.

काही दिवसांपूर्वी शहरातील खासगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या एका वैद्यकीय शिक्षण घेणाऱया तरुणाचा मृत्यू झाला. त्याला कोरोनाचाही संसर्ग झाला होता. डेथ ऑडिट कमिटीने केलेल्या तपासणीमध्ये या तरुणाचा मृत्यू ‘एच3एन2’ या नव्या विषाणूमुळे झाल्याचा निष्कर्ष काढण्यात आला होता. त्यानंतर आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी शहरातील वैद्यकीय संघटनेच्या पदाधिकाऱयांची व अधिकाऱयांची बैठक घेतली.

यात घरोघरी जाऊन सर्दी, खोकला व ताप असलेल्या नागरिकांची माहिती संकलित करून त्यांच्या तपासण्या करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. तसेच, शासनाच्या निर्देशानुसार लक्षणे असलेल्या दररोज 140 व्यक्तींच्या तपासण्या करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार आरोग्य केंद्राचे कर्मचारी घरोघरी जाऊन माहिती घेत आहेत. तसेच, ज्यांचे लसीकरण राहिले आहे, त्यांना लसीकरण करून घेण्याचे आवाहन करत आहेत.

लक्षणे आढळून आलेल्या रुग्णांना तपासणी करून घेण्याच्या सूचना दिल्या जात आहेत. आरोग्य केंद्रांवर तपासणीची संख्या वाढविण्यात आली आहे. कोरोनाचा एखाद दुसरा रुग्ण आढळून येत आहे. मात्र, ‘एच3एन2’चा नवा रुग्ण आढळला नसल्याचे डॉ. बोरगे यांनी सांगितले.