कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या मुकाबल्यासाठी 227 कोटींचे ऑक्सिजन सिलिंडर

कोरोनाच्या संभाव्य तिसऱया लाटेमध्ये रुग्णांची आणि पर्यायाने ऑक्सिजनची मागणी प्रचंड वाढण्याची शक्यता आहे. तिसऱया लाटेचा सामना करण्यासाठी मागील लाटेच्या तुलनेत तीन पट ऑक्सिजनचा साठा करावा लागण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे ऑक्सिजनच्या मुबलक साठय़ासाठी आवश्यक डय़ुरा सिलिंडर व क्रायो टँकच्या खरेदीसाठी तब्बल 227 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत.

कोरोनाच्या संभाव्य तिसऱया लाटेच्या पूर्वतयारीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार व मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्या स्तरावर मध्यंतरी बैठक आयोजित केली होती. कोरोनाच्या दुसऱया लाटेत राज्यातील सर्व जिह्यांत आवश्यक असलेली कमाल ऑक्सिजनची गरज व कमाल रुग्णसंख्या विचारात घेण्यात आली. त्या तुलनेत 25 टक्के रुग्णवाढ लक्षात घेऊन यापूर्वी लागलेल्या ऑक्सिजनच्या गरजेपेक्षा तीन पट अधिक ऑक्सिजनच्या पूर्वतयारीच्या सूचना राज्य सरकारने सर्व जिल्हाधिकाऱयांना दिल्या आहेत. मागील लाटेत ऑक्सिजनचा साठा व वाहतूक करण्यासाठी टँकरची संख्या कमी पडली होती. त्यामुळे मागील अनुभव लक्षात घेता प्रत्येकी 300 लिटर क्षमतेचे 3 हजार 798 डय़ुरा सिलिंडर व प्रत्येकी 20 किलो लिटर क्षमतेचे 226 क्रायो टँक खरेदी करण्यास राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने आज मान्यता दिली आहे.

ऑक्सिजनची मागणी वाढणार

महाराष्ट्रात कोरोनाचा संसर्ग अत्युच्च शिखरावर होता तेव्हा दरोज 1 हजार 700 मेट्रिक टन ऑक्सिजनची गरज भासत होती. आता ऑक्सिजनची क्षमता दोन हजार मेट्रिक टनची आहे. पण तिसऱया लाटेत दररोज चार हजार मेट्रिक टन ऑक्सिजनची गरज भासेल असा अंदाज वर्तवण्यात येतो आणि मागणी वाढली तर पुन्हा लॉकडाऊन केला जाईल.

तिसरी लाट अटळ

सण उत्सव लक्षात घेता केंद्र सरकारने दिलेल्या इशाऱयानुसार राज्यात सप्टेंबर ते ऑक्टोबर महिन्यात कोरोनाची तिसरी लाट अटळ असल्याचा इशारा वैद्यकीय तज्ञांनी दिला आहे.

ऑक्सिजन टँकरमध्ये रूपांतर

दुसऱया लाटेत ऑक्सिजनची वाहतूक करण्यासाठी टँकरचा तुडवडा निर्माण झाला होता. त्यावेळी नायट्रोजन वायू व आरगाँन वायूची वाहतूक करणाऱया टँकरपैकी किमान 50 टक्के टँकरचे चोवीस तासांच्या आत लिक्विड मेडिकल ऑक्सिजन वाहतूक करणाऱया टँकरमध्ये रूपांतर करण्याचे आदेश राज्य सरकारने जारी केले होते. या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या