मार्चमध्ये गावी परतलेल्या महिलेला मे मध्ये कोरोना, धाकधूक वाढली

5702

कळंब तालुक्यातील शिराढोण येथील एक महिलेला कोरोनाची लागण झाल्यामुळे गावाच्या सीमा बंद करण्यात आल्या असून आज शिराढोण येथील महिलेच्या संपर्कातील आठ तर हावरगाव येथील संपर्कातील सहा असे चौदा जणांचे स्वॅब घेऊन तपासणी पाठवण्यात आले. तालुक्यात एकूण सहा कोरोनाचे रुग्ण सापडल्यामुळे तालुका कोरोनाचा हॉटस्पॉट झाला आहे. यामुळे गावा गावात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

तालुक्यामध्ये कोरोनाने पाय पसरण्यास सुरुवात केली आहे. दिनांक 21 मे रोजी शिराढोण येथील एक महिलेला कोरोना झाल्याचे उघड झाल्यामुळे तालुक्यातील खळबळ उडाली आहे. दिनांक 19 मार्च रोजी हे पती, पत्नी, मुलगा व मुलगी असे कुटुंब पुणे येथून शिराढोण येथे आले होते. यांची दिनांक 23 मार्च रोजी प्राथमिक आरोग्य केंद्रात नोंद करण्यात आली होती. दिनांक 9 मे रोजी आजारामुळे शिराढोण येथील खासगी दवाखान्यात उपचार घेतला होता. त्यानंतर दिनांक 11 मे रोजी लातुर येथील खासगी दवाखान्यात दाखविण्यात आले होते. त्यानंतर दिनांक 19 मे रोजी खासगी दवाखान्यात उपचार चालू असताना या महिलेला कोरोनाचे लक्षणे दिसून आल्यामुळे त्या महिलेचा स्वॅब नमुना लातुर येथील प्रयोग शाळेत पाठवण्यात आला होता. या महिलेला कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले आहे. या महिलेवर लातुर येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे. या महिलेच्या संपर्कातील आठ तर हावरगाव येथील दोन महिलांच्या संपर्कातील सहा जणांचे असे चौदा जणांचे स्वॅब घेऊन लातुर येथे तपासणीसाठी पाठवण्यात आल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ जीवन वायदंडे यांनी दिली.

या संदर्भात उपविभागीय अधिकारी आहिल्या गाठाळ यांनी गावच्या सीमा बंदीचे आदेश काढले असून त्यानुसार गावामध्ये येणारे रस्ते बंद करण्यात आले आहेत. गावातील लोकांना बाहेर निघण्यास पायबंद घालण्यात आला आहे. दिनांक 4 जून पर्यंत सीमा बंदी असणार आहे. त्यामुळे गावात दिवसभर शुकशुकाट होता. प्रशासकीय यंत्रणेने विविध उपाययोजना करण्याची सूचना दिली. मात्र गावात कोरोनाचे रुग्ण सापडल्यामुळे भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

ज्या महिलेला कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्या पतीचे शिराढोण गावात कपड्याचे दुकान असल्यामुळे गावात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे प्रशासनाकडून संपर्कातील व्यक्तीचा शोध घेण्यात येत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या