कोरोनामुळे मृत्यू – वीज कामगारांच्या नातेवाईकांना मिळणार सात दिवसांत आर्थिक मदत!

312

कोरोना महामारीच्या संकटात जीवाची पर्वा न करता काम करणाऱ्या वीज कामगारांना मोठा दिलासा मिळणार आहे. एखाद्या वीज कर्मचाऱयाचा कोरोनामुळे मृत्यू झाल्यास त्याच्या नातेकाईकांना अवघ्या सात दिवसात 30 लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याचा निर्णय महावितरणने घेतला आहे. त्यासाठी सर्व कागदी सोपस्कार बाजूला ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे संकटात सापडलेल्या वीज कामगारांच्या नातेवाईकांची आर्थिक कोंडी फुटणार आहे.

महावितरणचे राज्यभरात 65 हजारहून अधिक कामगार काम करत आहेत. त्यापैकी 80 टक्क्यांहुन अधिक कर्मचारी वीज पुरवठा अखंडित रहावा म्हणून फिल्डवर काम करत आहेत. त्यामुळे त्यांना कोरोनाचा संसर्ग होऊन मृत्यू ओढवण्याची भीती आहे. त्याची दखल घेत मृत कामगाराच्या नातेवाईकांना 30 लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याचा निर्णय महावितरणने याआधीच घेतला आहे. मात्र कर्मचाऱयाचा कोरोनमुळे मृत्यू झाला असला तरी त्याबाबतचे प्रमाणपत्र देण्यास नगरपालिका, नगरपरिषद किंवा संबंधित आरोग्य यंत्रणेकडून विलंब लागतो. त्यामुळे संबंधिताला आर्थिक मदत देण्यास विलंब होत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे कर्मचाऱयाच्या मृत्यू प्रमाणपत्राची वाट न बघता केवळ संबंधिताचा मृत्यू कोरोनमुळे झाला आहे, याची खातरजमा करून मदतीबाबतच प्रस्ताव सादर करून सात दिवसात मदत द्यावी असे निर्देश महावितरणच्या व्यवस्थापकीय संचालकांनी दिले आहेत.

आर्थिक मदत मंजूर करण्याचे अधिकार परिमंडळ अधिकाऱयांना

कोरोनामुळे एखाद्या कर्मचाऱयाचा मृत्यू झाल्यास त्याच्या नातेकाईकांना दिली जाणारी 30 लाख रुपयांची आर्थिक मदत मंजूर करण्याचे अधिकार याआधी प्रादेशिक कार्यालयाला होते. त्यामुळे मदतीचा प्रस्ताव पाठवल्यानंतर तो मंजूर होण्यास विलंब होत असल्याने केळेत मदत मिळत नव्हती. त्यामुळे प्रशासनाने आर्थिक मदत मंजूर करण्याचे अधिकार विभागीय परिमंडळातील मुख्य अभियंत्यांना दिले आहेत. तसेच एखाद्या वीज कर्मचाऱयाला कोरोनाचा संसर्ग झाला असेल तर त्याला वेळेत योग्य उपचार मिळावेत म्हणून करिष्ठ अधिकाऱयांनी संबंधित आरोग्य विभागाकडे पाठपुरावा करावा असे स्पष्ट केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या