टेन्शन! महाराष्ट्रातला कोरोना डेंजरस!! मंत्रालयात 35 रुग्ण सापडले!!

मुंबईसह राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असतानाच मंत्रालयातील 35 कर्मचाऱ्यांना कोरोनाने गाठले आहे. त्यामुळे अधिकारी-कर्मचाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. दुसरीकडे महाराष्ट्राची चिंता वाढवणारी बातमी नवी दिल्लीतून ‘एम्स’चे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी दिली आहे. महाराष्ट्रात कोरोनाचा नवा स्ट्रेन आला असून हा स्ट्रेन अधिक डेंजरस आहे. कारण या नव्या व्हेरिएंटमुळे ऍण्टी बॉडी विकसित झालेल्या लोकांमध्ये पुन्हा कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो, असे डॉ. गुलेरिया यांनी म्हटले आहे. दरम्यान, मुंबईतही धोक्याची घंटा वाजली असून आठवडाभरात मुंबईतील कोरोना रुग्णसंख्येमध्ये तब्बल 36 टक्के वाढ झाल्याची माहिती महापालिकेने दिली.

मंत्रालय तसेच सरकारी कार्यालयांत कर्मचाऱ्यांची 100 टक्के उपस्थिती सुरू झाल्यानंतर पुन्हा एकदा कोरोना डोकं वर काढू लागला आहे. मागील आठवडय़ातच महसूल विभागातील 3 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली असताना आता पुन्हा 23 कर्मचारी व अधिकाऱ्यांची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्याचप्रमाणे शिक्षण विभागातही कोरोनाने शिरकाव केला असून 12 जणांची चाचणी जणांची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.

महसूल विभागात आज आढळून आलेल्या कोरोना बाधितांमध्ये 2 उपसचिव, 4 अप्पर सचिव, 3 कक्ष अधिकारी, 4 सहाय्यक कक्ष अधिकारी आणि 7 ते 8 कारकून असे मिळून 23 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यापैकी एका कर्मचाऱ्याची प्रकृती गंभीर असल्याचे समजत असून आणखी काही जणांचे अहवाल अद्याप वरिष्ठांकडे यायचे आहेत. त्याचप्रमाणे शिक्षण विभागातील 12 जणांनाही कोरोनाची लागण झाली असून यामध्ये अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. ज्या कर्मचाऱ्यांना लागण झाली आहे. त्यापैकी बहुतांशी कर्मचारी हे गुरुवारी कार्यालयात हजर होते. त्यानंतर शुक्रवारी त्यांना त्रास जाणवू लागल्यानंतर चाचणी केली असता त्यांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्याचप्रमाणे वरळी येथील धर्मादाय कार्यालयातही एका अधिकाऱ्याला कोरोनाची लागण झाली आहे. यामुळे या अधिकाऱ्याचा कक्ष सील करण्यात आला आहे.

मंत्रालयात अभ्यागतांना प्रवेश बंद करण्याची कर्मचारी संघटनांची मागणी

मागील दोन ते तीन दिवसांपासून मंत्रालयातील विविध विभागांतील अधिकारी, कर्मचारी मोठय़ा प्रमाणात कोरोना बाधित झाले आहेत. हा प्रकार टाळण्यासाठी मंत्रालयात येणाऱ्या अभ्यागतांवर कोरोनाचा धोका टळेपर्यंत निर्बंध आणावेत, अशी मागणी महाराष्ट्र मंत्रालय अधिकारी संघटनेनेसह विविध मंत्रालयीन कर्मचारी संघटनांनी केली आहे.

रुग्ण दुप्पटीचा कालावधी कमी झाला

मुंबईतील रुग्णसंख्या झपाटय़ाने वाढत आहे. 8 फेब्रुवारीला 5335 ऍक्टिव्ह केसेस होत्या. रविवार 21 फेब्रुवारीला त्या 7276 वर पोहचल्या. तर 8 फेब्रुवारीला रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा कालावधी 574 दिवसांचा होता तो 21 तारखेला 346 दिवसांवर घसरला आहे.

असे वाढले रुग्ण

09 फेब्रुवारी       375

10 फेब्रुवारी       558

11 फेब्रुवारी       510

12 फेब्रुवारी       599

13 फेब्रुवारी       529

14 फेब्रुवारी       645

15 फेब्रुवारी       493

16 फेब्रुवारी       461

17 फेब्रुवारी       721

18 फेब्रुवारी       736

19 फेब्रुवारी       823

20 फेब्रुवारी       897

21 फेब्रुवारी       921

22 फेब्रुवारी       761

राज्यातील प्रतिबंध

नागपूर – नागपूर जिल्हय़ातील शाळा-कॉलेज 7 मार्चपर्यंत बंद.

संभाजीनगर – शहरातील शाळा 28 फेब्रुवारीपर्यंत बंद, दहावी-बारावीचे वर्ग मात्र सुरू.

जालना – जमावबंदी लागू. मंगल कार्यालयांवर कारवाई.

कोल्हापूर – शहरातील 27 मंगल कार्यालयांवर धाड; हजारोंचा दंड वसूल.

सिंधुदुर्ग – जिल्हय़ात 8 दिवस रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

परभणी – शाळा-कॉलेज 28 फेब्रुवारीपर्यंत, आठवडा बाजार 7 मार्चपर्यंत बंद.

सातारा – रात्री 11 ते सकाळी 6 पर्यंत संचारबंदीचे आदेश लागू.

बुलढाणा – नागरिकांना सकाळी 8 ते दुपारी 3 पर्यंतच अत्यावश्यक कामासाठी घराबाहेर पडण्याची परवानगी.

सोमवारची रुग्णसंख्या –

राज्य – 5210, मृत्यू – 18 

मुंबई – 761, मृत्यू – 00

मुंबईकरांचा मास्क नाकावर यायला हवा!

मास्क घाला, शिस्त पाळा, लॉकडाऊन टाळा’ अशा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आवाहनाला आज मुंबईकरांनी चांगला प्रतिसाद दिल्याचे दिसून आले. मास्क घालण्यास टाळाटाळ करणारे ‘लॉकडाऊन नको रे बाबा म्हणत’ मास्क घालू लागले. पण मास्क केवळ तोंडावर किंवा तोंडाखाली नको तर कोरोना विषाणूचे मुख्य प्रवेशद्वार असलेल्या नाकावर यायला हवा असे तज्ञांनी म्हटले आहे.  पालिका मार्शल आणि पोलीस यांच्या समोर मास्क घातला जातो आणि नंतर मात्र मास्क खाली करून बिनधास्त फिरणारे महाभाग दिसू लागले आहेत, हे थांबायला हवे!

विनामास्क रेल्वे प्रवाशांकडून 11 लाखांचा दंड वसूल

विनामास्क असणाऱ्या रेल्वे प्रकाशांविरोधात सुरू असलेल्या कारवाईत 1 ते 21 फेब्रुवारीपर्यंत मध्य आणि पश्चिम रेल्वेवर मिळून एकूण सुमारे 11 लाखांचा दंड वसूल करण्यात आला आहे. मध्य रेल्वेवर या काळात विनामास्क प्रकरणात 3497 केसेस दाखल होऊन 8 लाख 6 हजार 900 रुपयांचा दंड तर पश्चिम रेल्वेवर 2,200 केसेस दाखल करण्यात येऊन 3 लाख 21 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या