वर्षअखेरीस कोरोना लस मिळणे कठीण; कोरोना लस उत्पादक सिरम इन्स्टिट्यूटची माहिती

494

जगाची अफाट लोकसंख्या पाहता पूर्ण जगासाठी कोरोनाप्रतिबंधक लस तयार करायला आणि त्याचे सर्वत्र वाटप करायला किमान 4 वर्षे तरी लागतील असे परखड मत हिंदुस्थानात कोरोना रोधक लस बनवणाऱया सिरम इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया या कंपनीचे सीईओ अडार पुनावाला यांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षअखेरीपर्यंत कोरोना लस मिळणे कठीण असल्याचे स्पष्ट झाले आहे.

कोरोना महामारीने अवघ्या जगात थैमान माजवले आहे. त्यामुळे जगासाठी अब्जावधीच्या संख्येत कोरोना प्रतिबंधक लसीचे डोस बनवावे लागतील.सध्या जगातील औषधी कंपन्यांची तेव्हढी क्षमता नाही असे स्पष्ट करून पुनावाला म्हणाले, सर्व जगाला पुरतील इतके 15 अब्ज कोरोनाप्रतिबंधक डोस बनवण्यासाठी किमान 4 ते 5 वर्षे लागतील.तेवढा काळ आपल्याला प्रतीक्षा करण्यावाचून पर्याय नाहीय. जगातील प्रत्येक नागरिकापर्यंत या लसीचा डोस पोचवण्याचे उद्देश आम्ही जगातील औषध कंपन्यांनी ठेकला आहे.

देशात शीतगृह साखळी उभारावी लागेल

हिंदुस्थानातील 1.4 अब्ज नागरिकांपर्यंत कोरोना लसीचा डोस पोचवणे हे कठीण काम आहे. सुरक्षित ठेवण्यासाठी शीतगृहांची ( कोल्ड स्टोरेज ) आपल्याला उभारावी लागणार आहे. ती नसेल तर या लसीचे देशभर वितरण मुश्किल होईल.आम्हाला देशातील 40 कोटी नागरिकांसाठी कोरोना लस प्रीझ करून ठेवता येईल अशी शीतगृह साखळी आवश्यक आहे.सिरम इन्स्टिटय़ूट 68 देशांसाठी कोरोना प्रतिबंधक लस तयार करीत आहे. अन्य 92 देशांना ती पुरवण्यासाठीही आम्ही एस्ट्राजेनेका आणि नोवाकॅक्स यांच्यासह एकूण 5 कंपन्यांशी सहकार्य करार केला आहे. या लसीचे 1 अब्ज डोस तयार करण्याचे सिरमचे उद्दिष्ट आहे.

आपली प्रतिक्रिया द्या