महाराष्ट्रात प्रत्येकाला कोरोनाची लस मोफत, नवाब मलिक यांची घोषणा

भाजपने बिहारी जनतेला कोरोनाची लस मोफत देण्याची घोषणा केली आहे. पण बिहारमध्ये भाजपचा पराभव झाला तरी देशात मोफतच लसीकरण होणार आहे. केंद्रातील भाजपने महाराष्ट्रात मोफत लसीकरण केले नाही तरी आम्ही राज्यात प्रत्येकाला मोफत लस देऊ अशी घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते व अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी आज केली.

पत्रकारांशी बोलतना त्यांनी बिहारमधील भाजपच्या निवडणूक प्रचार व कोरोना लसीच्या वाटपावर भाष्य केले. भाजपची ही भूमिका संपूर्ण देशातील लोकांवर अन्याय करणार आहे. कारण देशातील सर्व जनेताला लस देण्याची जबाबदारी केंद्र सरकारची जबाबदारी आहे. आता प्रत्येक निवडणुकीत भाजपकडून मतदारांना लालूच दाखवली जात आहे. लोकांनी भाजपला मतदानच करू नका ते हरतीलच असे मलिक म्हणाले.

कोरोनाला मोदी जबाबदार

देशातील कोरोनाच्या वाढत्या संकटाला पंतप्रधान नरेंद्र मोदी संपूर्णपणे जबाबदार असल्याचा आरोप यावेळी मलिक यांनी केला. कोरोनाच्या संकटाची चाहूल लागताच 1 जानेवारीलाच हेल्थ इमर्जन्सी घोषित करून देशाच्या सीमा सील केल्या असत्या तर देशात लॉकडाऊन करण्याची गरज पडली नसती. मात्र ट्रम्प यांच्या प्रेमाखातर नमस्ते कार्यक्रमामुळे संपूर्ण देश उद्ध्वस्त झाला आहे. लाखो लोक बेरोजगार झाले आणि अर्थव्यवस्था उदध्वस्त झाली असा आरोपही नवाब मलिक यांनी यावेळी केला.

आपली प्रतिक्रिया द्या