Corona Vaccine – सिरम इन्स्टिट्यूट बिल गेट्स यांच्या मदतीने 10 कोटी डोस बनवणार, ‘एवढी’ असणार किंमत

1777

देशात कोरोना विषाणूची संख्या 20 लाखांच्या पार गेली असून रोजच 50 हजारांहून अधिक रुग्ण सापडत आहेत. जगातील आकडा देखील 2 कोटींच्या जवळ पोहोचला आहे. त्यामुळे सर्वांच्या नजरा कोरोना लसीचा शोध घेणाऱ्या वैज्ञानिकांकडे लागले आहे. याच दृष्टीने पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (एसआयआय) ने एक पाऊल टाकले असून उद्योजक बिल गेट्स यांच्या बिल एंड मेलिंडा गेट्स फाउंडेशन व GAVI सोबत महत्वाचा करार केला आहे. या करारांतर्गत 10 कोटी कोरोना डोसची निर्मिती केली जाणार आहे. सिरम इन्स्टिट्यूटचे प्रमुख आणि सीईओ अदार पुनावाला यांनी ट्विट करून यासंदर्भात माहिती दिली आहे.

कोरोना लसीचे 10 कोटी डोज तयार करण्यासाठी बिल गेट्स, गेट्स फाउंडेशन आणि GAVI यांच्यासोबत भागीदारी करण्यात आली असून यासाठी त्यांचे आभार, असे ट्विट अदार पुनावाला यांनी केले आहे.

दरम्यान, यासाठी बिल गेट्स फाउंडेशन जवळपास 150 मिलियन डॉलरचा निधी देणार आहे. GAVI मार्फत हा निधी सिरम इन्स्टिट्युटला कोरोना लसीच्या उत्पादनासाठी दिला जाईल. सिरम इन्स्टिट्युट 2021 पर्यंत जवळपास 10 कोटी डोस पुरवणार आहे. या लसीची किंमत जास्तीत जास्त 3 यूएस डॉलर म्हणजे फक्त 225 रुपये असणार आहे.

दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील चाचणीला परवानगी
सिरम इन्स्टिट्युट ऑफ इंडिया ही रोगप्रतिकारक औषधं निर्माण करणारी कंपनी आहे. औषध निर्माण करणारी जगातली सर्वोत्तम संस्था म्हणून ओळखली जाते. सिरम इन्स्टिट्युटने ऑक्सफर्ड AstaZeneca आणि अमेरिकेच्या Novavax या कंपनीसह करार केला आहे. या लसीची पहिल्या टप्प्यातील चाचणी यशस्वी झाली असून नुकतीच दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील चाचणीला परवानगी मिळाली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या