Corona Vaccine – रशियाने केलेल्या दाव्यांची WHO ने केली पोलखोल

1525

रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनी मोठा गाजावाजा करत कोरोना विषाणूवरील लस लॉन्च केली. मात्र रशियाच्या या दाव्यांवर जागतिक आरोग्य संघटनेला संशय असून यावर आता प्रश्न उपस्थित होत आहेत. रशियाने लॉन्च केलेल्या लसीची ऍडव्हान्स स्टेजमध्ये चाचणी घेण्यात आली अथवा नाही यावर डब्ल्यूएचओला संशय आहे. रशियाने जागतिक आरोग्य संघटनेने ठरवून दिलेल्या मानकांच्या आधारे चाचणी केली नाही, त्यामुळे ही लस धोकादायक ठरू शकते, असे डब्ल्यूएचओने म्हटले आहे.

रशियाने लस विकसित करताना, चाचणी करताना जागतिक आरोग्य संघटनेने आखून दिलेल्या निर्देशांचे, सूचनांचे पालन केले नाही. कोणतीही लस तिसऱ्या टप्प्यातील चाचणीशिवाय सर्वांना उपलब्ध करून देण्यात येत असेल तर हे धोकादायक असल्याचेही डब्ल्यूएचओच्या प्रवक्त्यांनी सांगितले. अनेकदा संशोधकांकडून लस विकसित झाल्याचा दावा करण्यात येतो. ही खरंतर आनंदाची बातमी असते. मात्र, लस प्रभावी असल्याचे संकेत मिळणे आणि क्लिनिकल चाचणीच्या सर्व टप्प्यांमधून लसीची चाचणी करणे यामध्ये फरक असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेचे प्रवक्ते क्रिस्टीयन लिंडमियर यांनी सांगितले.

खुशखबर! देशातील कोरोना लसीची पहिली मानवी चाचणी यशस्वी

तसेच डब्ल्यूएचओचे वरिष्ठ सल्लागार ब्रूस आयलवर्ड यांनी सांगितले की, रशियाने विकसित केलेल्या लसीबाबत आम्ही अद्याप कोणताही निर्णय घेऊ शकलेलो नाही, कारण याबाबत आमच्याकडे आवश्यक माहिती नाही. सध्या रशियासोबत याबाबत चर्चा सुरू असून कोरोना लस, चाचणी आणि पुढील पावलाबाबत माहिती घेतली जात आहे. यासह युरोपचे प्रसिद्ध संशोधक इसाबेल इमबर्ट यांनी घाईघाईने महामारीचा उपाय शोधण्याचा प्रयत्न अंगावर येऊ शकतो, असे म्हटले. अमेरिकेचे रोग विशेषज्ञ एंथन फाउची यांनीही यावर संशय व्यक्त केला आहे.

याआधी रशियाचे राष्ट्रपती व्लामदिर पुतीन यांनी जगातील पहिली कोरोना प्रतिबंधक लसीची नोंदणी करण्यात आल्याचे सांगितले होते. तसेच ही लस आपल्या दोन्ही मुलींनीही घेतली असल्याचे पुतीन यांनी सांगितले होते. मात्र तेव्हापासून यावर संशय व्यक्त केला जात आहे.

आपली प्रतिक्रिया द्या