अंत्यसंस्कार केलेला रुग्ण बरा असल्याचा फोन येतो तेव्हा….अहमदाबादेत रुग्णालयाचा धक्कादायक प्रकार!

4807
फोटो- प्रातिनिधीक

अहमदाबाद येथील सिव्हील रुग्णालयावर गुजरात उच्च न्यायालयाने ताशेरे ओढले असतानाच आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या देवरामभाई या रुग्णाचा मृत्यू झाल्याचे जाहीर करण्यात आले. मृतदेह कुटुंबाकडे सोपवून त्याचे दहन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी रुग्णालयातून देवरामभाई बरे असून त्यांना जनरल वॉर्डमध्ये हलवण्यात येत असल्याचे सांगितल्याने एकच खळबळ उडाली.

अहमदाबाद येथील सिव्हील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेल्या देवरामभाई भिसीकर यांना 28 मे रोजी कोरोना वॉर्डात हलवण्यात आले. त्यांना मधुमेह आणि हायपर टेन्शनचा त्रास होता. श्वास घेण्यासही त्रास होत होता. स्वॅब घेऊन करण्याची चाचणी करण्यात आली. रिपोर्ट येण्याआधीच 29 मे रोजी देवराम यांचा मृत्यू झाल्याचे जाहीर करण्यात आले. त्यांचा मृतदेह पीपीई किट मध्ये टाकून कुटुंबाच्या स्वाधीन करण्यात आला. कोरोना असल्याने चेहरा न पाहताच मोजक्या कुटुंबीयांच्या उपस्थितीत त्यांचे अंत्यसंस्कार करण्यात आले. दुःखात बुडालेल्या कुटुंबाला दुसऱ्या दिवशी 30 मे रोजी पुन्हा फोन आला. तुमच्या रुग्णाची तब्येत सुधारत असून त्यांना जनरल वॉर्डमध्ये हलवण्यात येत आहे. हे ऐकून हैराण झालेल्या आणि आशेचा किरण दिसलेल्या कुटुंबीयांनी थेट रुग्णालय गाठले. पण तिथे त्यांना चुकून फोन करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

पुन्हा एक फोन
रुग्णालयाकडून सुरू असलेला हा गोंधळ काही थांबला नाही . घरी परतलेल्या कुटुंबियांना पुन्हा फोन आला देवरामभाई यांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. या फोनने कुटुंबीय पुन्हा बुचकळ्यात पडले. अखेर रुग्णालयातून माहिती घेतली असता त्यांचा मृत्यू झाला आहे हे कळाले. हा केवळ अहवाल आल्यानंतर माहितीसाठी फोन करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

आपली प्रतिक्रिया द्या