लॉकडाऊन काळात मदत वाटपाचे फोटो प्रसारित केल्यास कायदेशीर कारवाई होणार

राज्य शासनाने जाहीर केलेल्या लॉक़डाऊन काळात फुड पॅकेटस, किराणा किटस, सॅनिटायझर मास्क या स्वरुपाची मदत वाटप बाबतचे फोटो काढून ते सोशल मीडिया वर्तमानपत्र, दुरचित्रवाणी यावर प्रसिद्ध करण्यास प्रतिबंध
करण्यात आला आहे. यासंदर्भातील आदेश जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जारी केले आहेत.

राज्य शासनाने कोरोना विषाणूचा (कोव्हीड 19) प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 दिनांक 13 मार्च पासून लागू करुन खंड 2,3,4 मधील तरतुदीनुसार अधिसुचना निर्गमित केलेली आहे. त्याअन्वये जिल्हाधिकारी हे त्यांचे कार्यक्षेत्रात कोव्हीड-19 वर नियंत्रण आणण्यासाठी व त्यांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ज्या उपाययोजना करणे आवश्यक आहे त्या करण्यासाठी सक्षम प्राधिकारी म्हणून जिल्हाधिकारी यांना घोषीत करण्यात आलेले आहेत.

कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊन आदेशामुळे बंद झालेल्या उद्योग व्यवसायातील प्रभावित झालेले कामगार, परराज्यातील विस्थापित कामगार व बेघर व्यक्ती यांचेसाठी निवारागृह, अन्न, पाणी, वैदयकीय देखभाल या सुविधा स्वयंसेवी संस्थांच्या सहाय्याने केंद्रीय किचन व्यवस्थेच्या माध्यमातून शिजविलेले/शिजविण्यासाठी तयार अन्नाचा पुरवठा करण्यात यावे असा निर्णय घेण्यात आलेला आहे. अनेक स्वयंसेवी संस्था, राजकीय पक्ष, नेते/व्यक्ती यांच्या मार्फत फुड पॅकेटस, किराणा किटस, सॅनिटायझर मास्क या स्वरुपाची मदत वाटप करीत आहेत. ही मदत वाटप करताना मोठया प्रमाणात गर्दी करीत आहेत आणि सोशल डिस्टन्स तत्वाचे पालन होताना दिसत नाही. तसेच मदत वाटपाबाबतचे फोटो घेऊन सदरचे फोटो हे सोशल मिडीया, वर्तमानपत्र, दुरचित्रवाणी यावर प्रसारीत करीत असल्याचे निदर्शनास आल्याने यासंदर्भातील आदेश जारी करण्यात आले आहेत.

स्वयंसेवी संस्था राजकीय पक्ष, नेते/व्यक्ती यांनी मदत वाटप करण्यापूर्वी आदेशात नमूद बाबींचे पालन करावे, असे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यानुसार, कोणत्याही प्रकारची मदत वाटप करण्यापूर्वी नजीकच्या तहसिल कार्यालय व पोलीस स्टेशन यांचेकडून व्यक्तीगत व वाहनांचे पासेस प्राप्त करुन घ्यावेत. कुठल्याही परिस्थितीत मदत वाटप करणारे व मदत घेणारे यांचे व्यतिरिक्त कोणीही वाटप करताना असु नये. मदत वाटप करणा-यांची संख्या दोन पेक्षा अधिक असु नये. अशा कुठल्याही प्रकारचे मदत वाटपाबाबतचे फोटो प्रसार माध्यमे व सोशल मीडियाव्दारे प्रसारीत करु नये.  मदत वाटप करताना दोन पेक्षा अधिक व्यक्ती आढळल्यास व मदत वाटपाबाबतचे फोटो प्रसार माध्यमे व सोशन मिडीयाव्दारे प्रसारीत केल्यास फोटोतील सर्व व्यक्तींवर भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860)  च्या कलम 188 नुसार दंडनिय / कायदेशीर कारवाई करणेत येईल, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या