हिंदुस्थानपाठोपाठ ट्रम्प यांची WHO ला धमकी, चीनकडे जास्त लक्ष देत असल्याचा केला आरोप

2553

अमेरिकेमध्ये कोरोना आजाराने भयंकर उग्र रुप धारण केलं आहे. तिथे या आजारामुळे मरणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर तिथले विरोधी पक्ष आणि माध्यमे ही परिस्थिती नीट हाताळू शकत नसल्याचा आरोप करत आहेत. देशातील वाढत्या चिंतेमुळे त्रस्त झालेल्या ट्रम्प यांनी मंगळवारी हिंदुस्थानला हायड्रॉक्सीक्लोकोक्वीन औषधासाठी धमकी दिली होती. बुधवारी त्यांनी जागतिक आरोग्य संघटनेलाच धमकी देऊन टाकली आहे. कोरोनाशी मुकाबला करत असतेवेळी जागतिक आरोग्य संघटना ही चीनकडे जास्त लक्ष देत असल्याचा आरोप ट्रम्प यांनी केला आहे.

ट्रम्प यांनी एक ट्विट केलं आहे ज्यात त्यांनी म्हटलंय की “जागतिक आरोग्य संघटनेला अमेरिकेकडून सर्वाधिक निधी मिळतो. असं असूनही त्यांचं सगळं लक्ष चीनवर केंद्रीत झालेलं आहे. आम्ही त्यांना दिल्या जाणाऱ्या निधीबाबत आता विचार करणार आहोत. चीनसोबतच्या सीमा खुल्या करण्याचा त्यांनी सल्ला दिला होता, हा सल्ला मी आधीच नाकारला ते बरं झालं. त्यांनी असा सदोष सल्ला का दिला?” जागतिक आरोग्य संघटनेने अमेरिकेला, चीनच्या विमानांना येण्यास मुभा द्यावी असा सल्ला दिला होता. हा सल्ला ट्रम्प यांनी धुडकावून लावला होता.

ट्रम्प यांनी हे ट्विट केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना आरोग्य संघटनेला दिला जाणारा निधी बंद करू अशी धमकी दिली. ‘अमेरिका पहिले’ असा नारा देणाऱ्या ट्रम्प यांनी म्हटले की आम्ही जागतिक आरोग्य संघटनेला दिल्या जाणाऱ्या पैशाला बांध घालण्याचा विचार करत आहोत. हे सांगत असताना ट्रम्प यांनी जागतिक आरोग्य संघटनेला अमेरिकेकडून किती मदत केली जाते, त्यातील किती रक्कम देणार नाही याबाबत काहीही उल्लेख केलेला नाहीये. जागतिक आरोग्य संघटनेचे धोरण अमेरिकेबाबत पक्षपातीपणाचे असल्याचे ट्रम्प यांचे म्हणणे आहे. चीनकडे ही संघटना जास्त लक्ष देत असल्याचा त्यांचा आरोप आहे.

औषध पुरवठा न केल्यास जशास तसे उत्तर देऊ! ट्रम्प यांची हिंदुस्थानला धमकी
ट्रम्प यांनी मंगळवारी औषध देत नसल्यामुळे हिंदुस्थानलाही धमकी दिली होती. हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन या औषधांसाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ही धमकी दिली होती. अमेरिकेने या औषधांसाठी हिंदुस्थानकडे यापूर्वीही मागणी केली होती. हिंदुस्थानने या मागणीवर सोमवारपर्यंत निर्णय न घेतल्याने अमेरिकेने पुन्हा यासाठी मागणी केली होती. मात्र ही मागणी करत असतानाच ट्रम्प यांनी हिंदुस्थानला धमकीही दिली होती. ट्रम्प यांनी मंगळवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला होता. यावेळी ते म्हणाले की “मी रविवारी सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा केली. जर ‘हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन’ चा आमचा पुरवठा सुरू केला तर आम्ही तुमचे आभारी असू. मात्र जर हा पुरवठा सुरू झाला नाही तर तरी काही हरकत नाही. मात्र मग आम्हीही जशास तसं उत्तर देऊ”.

आपली प्रतिक्रिया द्या