कोरोनाने घेतले भीषण रूप, 24 तासात 4500 लोकांचा मृत्यू; रुग्णांचा आकडा साडेआठ लाखांहून अधिक

1858
प्रातिनिधीक फोटो

चीनच्या वुहान शहरातून जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसने भीषण रूप दाखवायला सुरुवात केली आहे. या व्हायरसच्या विळख्यात अडकून गेल्या 24 तासात जवळपास 4500 लोकांचा मृत्यू झाला आहे, तर रुग्णांची संख्या साडेआठ लाखांवर गेली आहे. गेल्या 24 तासात अमेरिका, इटलो आणि स्पेनमध्ये सर्वाधिक मृत्यू झाले आहेत.

इटलीत एका दिवसात 837 बळी गेले, तर अमेरिका आणि स्पेनमध्ये एकाच दिवसात 800 बळी गेले. अमेरिकेत मृतांचा आकडा चार हजार पार गेला आहे. कोरोना मृत्युंच्या संख्येत इटली, स्पेननंतर आता अमेरिका आणि फ्रान्स यांनीही चीनला मागे टाकले आहे.

अमेरिका आणि युरोपमध्ये कोरोनाचा कहर थांबायचे नाव घेत नसल्याचे चित्र आहे. जगभरातल्या आघाडीच्या देशांना कोरोनाला आळा घालणं कठीण होऊन बसलं आहे. अमेरिकेत कोरोनाग्रस्तांची संख्या 1 लाख 88 हजारांवर पोहचली असून मृतांचा आकडा चार हजार पार गेला आहे. यातील सर्वाधिक 1500 बळी न्यूयॉर्कमध्ये गेले आहेत.

इटलीत मृतांचा आकडा 12 हजारहुन अधिक झाला असून रुग्णांची संख्या 1 लाख 5 हजारांवर गेली आहे. स्पेनमध्येही कोरोना रुग्णांचा आकडा 95 हजारांवर पोहचला असून मृतांचा आकडा 8500 वर पोहचला आहे. एकीकडे इटली, स्पेन, अमेरिकेत कोरोना धुमाकूळ घालत असताना दुसरीकडे चीनमध्ये कोरोना आटोक्यात आला आहे. तिथे गेल्या 24 तासात फक्त 5 बळीची नोंद झाली असून एकूण मृतांचा आकडा 3500 पार गेली आहे.

फ्रान्समध्ये धोका वाढला
फ्रान्समध्ये कोरोनाचा कहर वाढत चालला आहे. एका दिवसात फ्रान्समध्ये 499 बळी गेले आहेत. फ्रान्सही आता कोरोना बळींच्या बाबतीत चीनच्या पुढे निघून गेला आहे. फ्रान्समध्ये मृतांचा आकडा 3523 इतका झालाय. ब्रिटनमध्येही आतापर्यंत 1800 जणांचा बळी गेला आहे. ब्रनेदरलँडमध्ये मृतांचा आकडा एक हजारावर गेला आहे, तर इराणमध्ये 2890 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या